लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : “आदिवासी संस्कृती ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक आहे. हा वारसा टिकवायचा असेल, तर आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन पुढे येणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे वीर विरांगना राणी दुर्गावती गोटुल समिती व जागतिक गोंड संघा मांदी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोडी पुनेम संमेलन तथा गोंडी भाषा समारोह व गागरा स्थापना दिन कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते.
घोडाम यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव करताना, आजच्या काळात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “आदिवासी समाजाने कला, हस्तकला आणि परंपरांच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक वारशात मोलाची भर घातली आहे. मात्र, या वारशाचे जतन करताना आधुनिक शिक्षणाची जोड देणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी समाजातील व्यसनाधीनतेच्या वाढत्या समस्येकडेही लक्ष वेधले. “व्यसनामुळे अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे युवकांनी व्यसनमुक्त होऊन कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र नैताम होते. यावेळी युवराज सयाम, दिवाकर सुरपाम, शालिक पत्रे, अशोक सुरपाम, प्रकाश सुरपाम, नैताम, खेचर कुमरे, तामराव मडावी, अचित सुरपाम, किशन मरापा, योगेश कुमरे, टिकाराम सुरपाम, सुनील कुमरे, सुरेश्वरी सुरपाम, दिपाली कन्नाके, गौरी सुरपाम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने आदिवासी देवतांची पूजा करून करण्यात आली. त्यानंतर गावातून भव्य गोंडी रैली काढण्यात आली. सायंकाळी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगाजी सुरपाम यांनी केले, संचालन शुभम सरपाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन अविनाश येरमे यांनी केले.