लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी दी,१७ : दंडकारण्यात पेटलेल्या आदिवासी शौर्याची जाज्वल्य गाथा, इंग्रजी साम्राज्याविरुद्ध उठलेली क्रांतीची ज्वाला आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या जंगोम सेनेचे रौद्र, थरारक नेतृत्व — या साऱ्या इतिहासकथांचे एकत्रित प्रतिबिंब काल अहेरीत सादर झालेल्या ‘जंगोम’ नाट्यप्रयोगातून विद्यार्थ्यांनी अनुभवलं.
जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी आणि गडचिरोली पोलिस विभाग यांच्या पुढाकाराने वासवी सेलिब्रेशन हॉल येथे डॉ. दंदे फाउंडेशन निर्मित आणि हेमेंदू रंगभूमी, नागपूर प्रस्तुत या ऐतिहासिक नाट्यकृतीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शेंडे, पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, दिग्दर्शक शुभम निकम, लेखक प्रवीण खापरे आदी मान्यवर उपस्थित होते.
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची पूर्वध्वनी ठरलेल्या दंडकारण्यातील आदिवासी बंडाची उग्रता, अत्याचारांविरोधातील संतप्त प्रतिकार आणि जंगोम सेनेची तब्बेत — हे सर्व नाटकाने इतक्या प्रत्ययकारी पद्धतीने साकारले की, प्रेक्षक अक्षरशः तल्लीन झाले.
शौर्य, त्याग, संघर्ष आणि प्रतिकाराची स्पंदने जणू सभागृहात दुमदुमत राहिली. विद्यार्थ्यांनी हा इतिहास केवळ पाहिला नाही, तर जणू ‘अनुभवला’.
विशेष म्हणजे, कलाकारांच्या भूमिका नाट्यमंचापुरत्या मर्यादित न राहता इतिहासाचा जिवंत, निसर्गसदृश अनुभव देणाऱ्या ठरल्या. प्रत्येक दृश्य, संवाद आणि लढाईचे सादरीकरण मन हेलावून टाकणारे आणि मनावर कोरले जाणारे होते.
कार्यक्रमासाठी पोलिस विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित ने-आणचे नियोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी आणि पोलिस स्टेशन अहेरी येथील अधिकारी—कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
अहेरीतला हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजन देणारा नाही, तर आदिवासी क्रांतीच्या उगमाशी जोडणारा, स्वातंत्र्यपूर्व इतिहासाची जाणीव करून देणारा आणि समाजमनात संघर्षशीलतेची नवी ज्योत प्रज्ज्वलित करणारा ठरला.