अस्मिता आदिवासींची, समृद्धी शेतीची — ‘कोया कृषी कुंभ २०२६’मधून गडचिरोलीच्या कृषी विकासाला नवे बळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आदिवासी परंपरा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती विकास यांचा संगम घडविणाऱ्या ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या भव्य कृषी महोत्सवाला गडचिरोली येथे उत्साहात प्रारंभ झाला आहे. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली, कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कृषी महोत्सव दि. ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कृषि महाविद्यालय प्रांगण, चंद्रपूर रोड, सोनापूर, गडचिरोली येथे पार पडत आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विधानसभा सदस्य डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती प्रिती हिस्लकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पारंपरिक रेला नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. मंचावरून कोया कृषी कुंभ आयोजनाचे महत्त्व स्पष्ट करताना कृषी क्षेत्रातील नवकल्पना, बाजारपेठेतील संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

उद्घाटनानंतर राज्यमंत्री आशिष जयस्वाल व उपस्थित अधिकारी वर्गाने कृषी कुंभ परिसरातील विविध स्टॉलना भेट देत कृषी क्षेत्रातील आधुनिक साधनसामग्री, संशोधित तंत्रज्ञान आणि शेतकरी उत्पादने यांची पाहणी केली. या कृषी महोत्सवात जवळपास ३५० हून अधिक स्टॉल उभारण्यात आले असून त्यामध्ये विविध शेती विषयक माहिती, कृषी तंत्रज्ञान, कृषी पुरक व्यवसाय, बाजारपेठ व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्रात प्रथमच प्रदर्शित करण्यात आलेले एअर कंडिशन यंत्रणेसह आधुनिक ट्रॅक्टर. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सुलभ व उत्पादक बनविण्याचा हा प्रयत्न शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला. याशिवाय तेलंगणातील चित्तूर येथील कमी उंचीची ‘गिर गाय’ देखील प्रदर्शनात ठेवण्यात आली असून पशुपालन क्षेत्रातील नव्या शक्यतांकडे लक्ष वेधले जात आहे.

या कृषी कुंभात जिल्हाभरातील विविध महिला बचत गटांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. बचत गटांच्या स्टॉलवर स्थानिक खाद्यपदार्थ, पारंपरिक वनौषधी उत्पादने, सेंद्रिय कृषी उत्पादन तसेच लघुउद्योगाशी संबंधित विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. त्यामुळे आदिवासी महिला व ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराला चालना मिळण्यास मदत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शासनाच्या विविध कृषी योजना, शेतकरी कल्याण उपक्रम आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती देणारे स्वतंत्र माहिती केंद्र देखील या कृषी कुंभात उभारण्यात आले आहे. संशोधीत कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच कृषी पूरक व्यवसायावरील मार्गदर्शन यामुळे हा महोत्सव केवळ प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांसाठी ज्ञान व संधीचे केंद्र बनला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी, तंत्रज्ञान आणि आदिवासी संस्कृतीचा संगम घडवणारा हा उपक्रम ठरत असून शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि कृषी तज्ज्ञांच्या सहभागामुळे जिल्ह्याच्या कृषी विकासाला नवे दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘कोया कृषी कुंभ २०२६’ हा केवळ कृषी मेळावा नसून आदिवासी अस्मिता, स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर आणि शाश्वत कृषी विकासाची नवी क्रांती घडवणारा उपक्रम ठरत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

Agriculture festival at gadchiroliGadchiroli koya mahotsavGadchiroli kurshi vibhag
Comments (0)
Add Comment