लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुल, १२ जून: बेंबाळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेची तांत्रिक लिंक गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार बंद पडत असल्याने शेकडो ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नियमित आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, युवक काँग्रेसने बँकेच्या व्यवस्थापनाला तीव्र इशारा दिला आहे – लिंक तत्काळ दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभं करू!
दररोज सकाळपासूनच ग्राहक बँकेच्या बाहेर रांगेत उभे राहतात, मात्र “लिंक डाऊन”चा बोर्ड पाहतच निराश होतात. पगार, शिष्यवृत्ती, व्यवसाय व्यवहार, कर्ज व्यवहार आणि इतर महत्वाच्या आर्थिक कामांसाठी आलेल्या ग्राहकांना परत जावे लागत असल्याने परिसरात प्रचंड असंतोष पसरला आहे.
यासंदर्भात युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन नीलमवार व जिल्हा सरचिटणीस प्रशांत उराडे यांनी बँक व्यवस्थापकांना भेटून स्पष्ट शब्दांत इशारा दिला –
“जर ही लिंक समस्येवर तात्काळ उपाययोजना केली नाही, तर युवक काँग्रेस शेकडो ग्राहकांसह बँकेसमोर तीव्र आंदोलन छेडणार!”
त्यांनी पुढे सांगितले, “हा केवळ तांत्रिक प्रश्न नसून, सामान्य जनतेच्या उपजीविकेचा आणि आर्थिक सक्षमीकरणाचा प्रश्न आहे. ही बँक आदिवासी व ग्रामीण भागासाठी महत्वाची असून, सातत्याने लिंक डाऊन असल्यामुळे सरकारच्या योजनांचाही लाभ सामान्यांना मिळत नाही.”
स्थानिक ग्रामस्थ, महिला व जेष्ठ नागरिकांनीही युवक काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, बँक प्रशासनाने त्वरित सुधारणा न केल्यास बेंबाळसह संपूर्ण तालुक्यातून आवाज उठवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.