लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील डांगुर्ली गावात मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी घटना उघड झाली आहे. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २० दिवसांचा बालक चोरीस गेल्याची तक्रार नोंदली गेली होती. या प्रकरणाने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर रावणवाडी पोलिसांनी तपास वेगात सुरू केला. तपासादरम्यान १९ नोव्हेंबरला महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमेवरील वाघनदीच्या पात्रात नवजात बाळाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मात्र पुढील चौकशीत बालकाचा जीव कोणीतरी बाहेरचा नव्हे, तर स्वतः जन्मदात्रीनेच घेतल्याचे भयावह वास्तव समोर आले.
रियासिंह राजेंद्रसिंह फाये या डांगुर्लीतील महिलेने वीस दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला होता. १७ नोव्हेंबरला रात्री तिच्या घरी बालक आढळत नसल्याचा प्रकार घडला. आई शौचालयास गेल्यानंतर काही मिनिटांत परत येताच बाळ बेपत्ता असल्याची माहिती तिने पतीला आणि नातेवाईकांना दिली. परिसरात रात्रीच शोधमोहीम राबवण्यात आली; परंतु बाळाचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर प्रकरणाची नोंद रावणवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी तपासाची घडी बसवून कुटुंबीयांची सविस्तर चौकशी सुरू केली. त्यानंतर बाळाचा मृतदेह नदीपात्रात सापडताच संशय अधिक बळावला. चौकशीच्या दरम्यान आईनेच बालकाला नदीत फेकल्याची कबुली दिल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
तपासानुसार रियाचे लग्न राजेंद्रसिंह फाये यांच्याशी झाले होते. लग्नानंतर नोकरी करण्याची तिची इच्छा होती; मात्र गर्भधारणेमुळे रोजगाराचे स्वप्न पुढे ढकलावे लागले. गर्भपाताचा आग्रह तिने धरण्यास पतीने नकार दिल्यानंतर तिच्या मनातच बाळाबाबत नकारात्मकता निर्माण झाल्याचे पोलिसांना सांगितले. बाळ जन्मल्यानंतर नोकरी आणि व्यक्तिगत आयुष्य अडथळ्यात येईल, या विचारातूनच तिने १७ नोव्हेंबरच्या रात्री बाळाला घराजवळील नदीपात्रात ढकलल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
या प्रकरणी रिया राजेंद्रसिंह फाये हिच्याविरुद्ध रावणवाडी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पुढील कार्यवाहीसाठी सुरु आहे. समाजमनाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेने ‘मायलेकाच्या पवित्र नात्यालाच कलंक’ लागल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.