समाजातील अत्यंत दुर्लक्षित लालबत्ती एरियात काम करण्याची गरज – गिरीश कुलकर्णी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपुर २६ जून :समाजाच्या वाईट नजरेने बघितला गेलेला आणि प्रत्येक शहराचा तितकाच अविभाज्य असलेला भाग म्हणजे लालबत्ती एरिया समाजातील अत्यंत हीन, दीन, दुर्लक्षित आणि अनेक समस्यांची खाण असलेल्या भागात काम करण्याची खरी आवश्यकता आहे.  लोकांनी या कामाकरिता पुढे यावे असे आवाहन स्नेहालय चे प्रा.डॉ. गिरीश महादेव कुलकर्णी यांनी ‘ग्रामायण’ सेवागाथाच्या आभासी कार्यक्रमात बोलताना केले.

चांगला संकल्प केला तर परमेश्वर सुद्धा साथ देतो हा अनुभव आला. अनेक दानशूर व्यक्तींनी या कामात मदत केली. समाज द्यायला तयार आहे . मनात चांगला विचार आला की तो लगेच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. परमेश्वर १०० हातांनी देण्यास तयार आहे पण तुम्ही पुढे व्हायला पाहिजे. प्रश्न आले की त्यांना सामोरे गेलो, उत्तरे मिळत गेली.

अहमदनगर जिल्ह्यात लालबत्ती वस्तीत काम करणाऱ्या महिलांच्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या ‘स्नेहालय’ या संस्थेची स्थापना, विकास करतानाचा त्यांचा संघर्ष, आलेले अनुभव डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी उलगडून दाखवले.

अहमदनगर येथे सारडा कॉलेजात शिकत असताना आलेला अ. भा. विद्यार्थी परिषदेशी संबंध समाजातील या दुर्लक्षित भागाकडे “माणूस” म्हणून काम करण्याचे शिकवून गेला. लहानपणी शिकवणी वर्गाकरिता लालबत्ती एरियातून जावे लागे.

त्यावेळी आपल्या वयाच्या मुली तिथे पाहून, त्यांचे दुख:, दैन्य, पीडा अनुभवास आली आणि मनाच्या एक कोपऱ्यात ते साठवले गेले. पुढे १९८८ साली मनातील अस्वस्थता या वस्तीतील समस्यांसाठी काम करण्यासाठी कारणीभूत ठरली. विद्यार्थी परिषदेतील कामाचा अनुभव होता. एकदा ठरवले की त्यामागे जिद्दीने मागे लागायचे हा स्वभाव झाला होता, त्यामुळे पहिल्यांदा या वस्तीत गेलो, डॉक्युमेंन्टेशन करण्यासाठी प्रश्नावली बनवली, माहिती विचारात फिरलो, पण उपयोग झाला नाही.

पुरुष जातीवर असलेला अविश्वास, काही ठोस करण्याचे उत्तर माझ्याकडे नसल्याने तेथिल महिलांनी प्रतिसाद दिला नाही. मग त्यांचे कडून त्यांच्या समस्या आणि उपाय मागितले. अनेक रोगांनी ग्रस्त झालेल्या आणि देहाने बरबाद झालेल्या या महिलांची खरी समस्या त्यांची अनौरस मुले हीच आहेत हे लक्षात आले. मुलांसाठी काही करता आले तर करा अशी मागणी होती.

सुरवातीला त्यांच्या मुलांना बगीच्यात घेऊन जाऊ लागलो त्यांना गोष्टी, गाणी सांगू लागलो. भुकेची समस्या भीषण होती, मंगल कार्यालयात, हॉटेलात जाऊन उरलेले अन्न गोळा करू लागलो, त्यासाठी एक हातगाडी घेतली. हळूहळू या महिलांचा विश्वास मिळू लागला. मी पण शिकत होतो. पोटाच्या भुकेबरोबर ही मुले प्रेमाच्या स्पर्शाची भुकेली होती. या वस्तीशी तिथल्या समस्यांशी मी जाणीवपूर्वक जुळत गेलो. काम करता करता अनेक लोक भेटत गेले, माझ्या या कार्याशी जुळत गेले. एक टीम तयार झाली.

मुलांना सुरवातीला घरी आणले. घरच्यांनी साथ दिली. दोन मुलांपासून सुरवात केली, ती पुढे १००/२०० मुले माझ्याशी जोडली गेली. वसतिगृह सुरु केले. HIV बाधितांसाठी वसतिगृह सुरु केले, दवाखाना सुरु केला, या लोकांसाठी डॉक्टर मिळत नव्हते, आम्हीच त्यांचे डॉक्टर झालो. वस्तीतील समस्यांचे किमान निराकरण करण्याचे उपाय शोधता शोधता मिळत गेले. कंडोम वापरण्याच्या सल्ला दिला, माझ्यावरील विश्वासामुळे या महिलांनी तो मानला.

गेल्या ३०-३२ वर्षापासून याच विषयावर स्नेहालय काम करीत आहे. आज नगर जिल्ह्यात या अशा वस्तीत अनेक चांगले बदल झाले आहेत. अल्पवयीन मुली या धंद्यात नाही. महिलांना गुप्तरोग आदी जडले नाहीत. ह्या वस्तीतील अनेक मुले आज शिकली, पदवीधर झाली, त्यांना चांगल्या नोकऱ्या लागल्या. आज ४०० मुलांचे वसतीगृह आहे, अडोप्शन सेंटर चालवतो आहोत. अनेक वेळा घरातच मुलींचे लैंगिक शोषण होते, आपल्या समाजासाठी हा प्रश्न मोठा आहे. त्या संदर्भातही आम्ही काम करतो आहोत. आज ३५० सेवाव्रती, २५० कार्यकत्यांची एक मोठी टीम यात काम करते आहे.

पांढरपेशा आणि उच्चभ्रू समाजाने उपभोगून थुंकलेले हे एक जग जे मला माहित नव्हते. असे हे वेश्यांचे, हिजड्यांचे, झोपडपट्टी वासियांचे हे नरकप्राय जग किती भीषण आहे. सामाजिक बदलाची आवश्यकता आहे. हे काम केवळ सरकारने, न्यायालयाने, पोलिसांनी करून चालणार नाही. ह्याचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात, चरस गांजा तर आहेतच पण गुन्हेगार, वाईट मानसिकता असलेली प्रशासनातील लोक, लाभ आणि लोभाच्या मोहाने समाजात असलेल्या राजकारणी व्यक्ती या लोकांशी कधी संघर्षाची वेळ येते. संसाधने उभे करावी लागतात. समस्या भीषण आहे.

समाजसेवेची आवड असणाऱ्या तरुणांनी, लोकांनी पुढे यावे, आमची संस्था अनुभवावी, पीडित, शोषितांच्या अशा वस्तीतील लोकांचे प्रश्न, समस्या सोडवल्या जाऊ शकतात. गरज आहे ती त्यांचाशी आपुलकीने प्रेमाने जवळ जाण्याची, असे भावनिक आवाहन ‘स्नेहालय ’ या संस्थेचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी यांनी ग्रामायण च्या सेवागाथा या कार्यक्रमातून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय अनिल सांबरे यांनी केला.

हे देखील वाचा :

उद्योजकांना वीज दरात सबसिडी देण्यास शासन अनुकूल – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

प्राध्यापकांच्या 3064 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

प्राथमिक आरोग्य केंद्र मन्नेराजाराम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांची आकस्मिक भेट

 

Girish kulkarnilead story