लोकस्पर्श न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, 10 जून- आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. या वारी सोहळ्यातीलच एक अत्यंत मानाची पालखी म्हणजे पैठण येथील संत एकनाथ महाराजांची पालखी. या पालखी सोहळ्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधून आज संध्याकाळी ६:३० च्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या वारीचे हे ४२४ वे वर्ष असुन १९ दिवसांच्या प्रवासानंतर ही पालखी पंढरपूरला २८ रोजी पोहोचणार आहे. पालखी मार्गावरील गावांतील भाविकांनीही पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. संत एकनाथ महाराजांच्या पालखीला प्रवासात हातकरवाडी येथील गावकरी वेगळ्या पद्धतीचा सन्मान दरवर्षी देतात.
गावातील लोक पालखी येण्याच्या आधी चार दिवस उपवास करतात, त्यानंतर नाथ महाराजांच्या वंशज यांना एका बैलगाडीत बसवलं जातं आणि ती गाडी पूर्ण घाट मार्गातून गावकरी स्वतः ओढून नेतात. नाथ महाराजांचे प्रस्थान झाल्यावर प्रवासात चार रिंगण सोहळे होतात, या रिंगण सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभाग घेतात. या सोहळ्यात तीन गोल तर एक उभे रिंगण सोहळा पार पडतो. तर पैठण येथून प्रवास सुरू होत असताना जवळपास ४५ दिंडी रथासोबत यंदा जात आहेत अशी माहिती नाथ महाराजांचे वंशज योगेश गोसावी यांनी दिली.
नाथांच्या पालखी सोहळ्याच्या रथामागे अमरावतीसह मराठवाड्यातील छोट्या-मोठ्या दिंड्या सहभागी होतात. सर्व संताचा काला हा गोपाळपूर येथे होतो फक्त संत एकनाथ महाराजांच्या काल्याचा कार्यक्रम मंदीरात होतो असे वैशिष्ट्य सांगताना १९ दिवसाच्या प्रवासात अनेक सोयी सुविधांपासून आजही वारकरी दूर राहतात. अनेक जिल्ह्यात योग्य ठिकाणी थांबे नसतात, त्यासाठी मोकळी जागा नसते. पाण्याची व्यवस्था योग्य प्रमाणात नसते. त्यामुळे या सगळ्या सुविधा देखील गेल्या पाहिजे अशी मागणी रघुनाथबुवा गोसावी यांनी केली.
हे पण वाचा :-