नगरपालिका निवडणुकीत चुरस वाढली — दोन दिवसांत एकाचीही माघार नाही; आज अखेरचा दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीनही नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी वैध उमेदवारांपैकी दोन दिवसांत एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. आज (दि. 21) दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची शेवटची संधी असून, विशेषत: अपक्ष तसेच बंडखोर उमेदवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

गडचिरोली नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार मैदानात असून, नगरसेवक पदासाठी १३ प्रभागांत १३४ वैध अर्ज आहेत. देसाईगंजमध्ये नगराध्यक्षपदासाठी ९, तर नगरसेवक पदासाठी १३१ अर्ज वैध ठरले आहेत. आरमोरीत नगराध्यक्षपदाचे ११, आणि नगरसेवकपदाचे ११८ उमेदवार रिंगणात आहेत.

यात पक्षाने नामांकन न दिल्यामुळे अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या बंडखोरांची संख्या लक्षवेधक आहे. गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी नगरसेवक पदासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरताच, त्याचवेळी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला आहे. त्या शर्यतीत कायम राहतात की माघार घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

देसाईगंजमध्येही माजी नगराध्यक्षा शालू दंडवते यांचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. त्या आज माघार घेतात की भाजपच्या बंडखोर उमेदवार म्हणून अपक्ष लढतीत उतरतात, हे आजच स्पष्ट होणार आहे.

माघारीच्या अंतिम क्षणांनीच निवडणूक रिंगणाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

gadchiroli electionGadchiroli Nagar parisda
Comments (0)
Add Comment