लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 03 सप्टेंबर :- राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात मान्सून हा सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
हवामान विभागाच्या महासंचालकांनी सदर माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास हा सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून होणार आहे. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात एकूण सरासरीच्या १०९ टक्के पावसाचा अंदाज आहे.
मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हे देखील वाचा :-
“या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा !