लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 11, जानेवारी :- चालकाचे प्रबोधन, चर्चा आणि कृतिशील कार्यवाही या माध्यमातून एसटी बसेसच्या अपघाताचे प्रमाण कमी करणे हा रस्ते सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. महामंडळावरचा प्रवाशांचा विश्वास यामुळे अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एसटीच्या रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात करताना केले.
या प्रसंगी बोलताना चन्ने म्हणाले कि, चालक हा वाहनाचा मेंदू असतो जसे शरीराचे नियंत्रण आपल्या मेंदूद्वारे होते त्याप्रमाणे वाहनाचे नियंत्रण चालकाद्वारे होते. त्यामुळे रस्त्यावरील परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरीही स्थितप्रज्ञ राहून आपल्या वाहनावर नियंत्रण मिळविण्याचे कौशल्य चालकाने आपल्या अंगी बाळगणे आवश्यक आहे. आपल्यावर गाडीतील ५० प्रवाशांची जबाबदारी असून आपल्या व्यक्तिगत अडी-अडचणीचे प्रतिबिंब कामगिरीवर होऊ नये याची दक्षता चालकाने घ्यावी. याबरोबरच महामंडळातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी चालकाला दिल्या जाणाऱ्या बसेस तांत्रिक दृष्ट्या निर्दोष असतील त्याची खात्री करूनच त्या मार्गस्थ कराव्यात. विशेष म्हणजे कामगिरीवर जाणाऱ्या चालकाची मानसिकस्तिथी चांगली राहील, असे वर्तन त्यांच्या सहकाऱ्यांकडून व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होणे अपेक्षित आहे.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून वर्षभर अपघाताचे प्रमाण कमी करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ असे अभिवचन याप्रसंगी प्रवाशांना देण्याचे आवाहन सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय कुरुंदकर उपस्थित होते. तत्पूर्वी अभियानाची सुरुवात एसटी महामंडळाचे चालक गणेश शंकर लवारे (ठाणे विभाग ) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी एसटीचे अधिकारी/कर्मचारी आणि चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विभाग नियंत्रक (मुंबई विभाग ) मोनिका वानखेडे यांनी मानले.
हे देखील वाचा :-