मेडीगट्टा धरणावरील गेट उघडण्याच्या मागणीसाठी संदीप कोरेत यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलनास सुरुवात

नागरीकांचाही आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

महादेवपूर तहसीलदारांची आंदोलनाला भेट, एका आठवड्याच्या आत गेट उघडण्यासंदर्भात पाऊले उचलू असे आंदोलन करतांना दिले आश्वासन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १६ डिसेंबर: सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा धरणावरील गेट उघडण्यात यावे या मागणीसाठी भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांनी आज ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात त्यांच्यासमवेत जवळपास १ हजार नागरिक सहभागी झाले आहेत. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हणुन तेलंगाणा शासनाच्यावतीने मेडीगट्टा प्रवेशद्वारावर मोठया प्रमाणात तेलंगाणा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.    

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर महाराष्ट्राच्या आणि गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावाजपळील गोदावरी नदीवर बसुचर्चित मेडीगट्टा प्रकल्प उभारण्यात आले. या प्रकल्पातून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना दाखविण्यात आलेले विकासाचे स्वप्न धुळीस मिळत असुन हा प्रकल्प नागरीकांना डोकेदुखी ठरत आहे.

महाराष्ट्र व तेलंगाणा राज्याच्या सिमेवर सिरोंचा तालुक्यात बांधण्यात आलेल्या मेडीगट्टा प्रकल्पावरील गेट बंद करण्यात आला असल्याने सिरोंचा तालुक्यातील ५० ते ६० गावातील २० ते २५ हजार नागरिकांना तेलंगणात आवागमनाचा मार्ग खंडित झाला आहे. प्रकल्प होण्यापूर्वी प्रत्येक गावातून डोंग्याने प्रवास केला जात होता. पण आता प्रकल्प झाल्यामुळे डोंग्याचा प्रवास पूर्णता बंद झाला आहे. आता छोट्याशा कामासाठी पुष्कळ मोठे अंतर कापावे लागत आहे. दवाखान्यात जायचे असल्यास किंवा शेतीच्या सामानासाठी जायचे असल्यास मार्ग बंद असल्यामुळे भरपूर त्रास होत आहे.

यासंदर्भात प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही दखल घेण्यात न आल्याने संदीप कोरेत व नागरिकांनी आजपासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला आहे. जोपर्यंत गेट उघडण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार करण्यात आला आहे.