प्रशासनाचा आत्मा – महसूल विभागाचा सेवाभाव सन्मानित

सेवा, सुसंवेदनशीलता आणि समर्पणाचा दिवस" — महसूल दिन व सप्ताहाचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते उद्घाटन करून कर्मचाऱ्यांना सर्जनशील आवाहन...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : प्रशासन म्हणजे केवळ कागदांवरील सही नाही, ती आहे तळागाळाशी जोडलेली जबाबदारी, आणि महसूल विभाग म्हणजे त्या जबाबदारीचा खंबीर आधारस्तंभ. शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही महसूल प्रशासनाच्या खांद्यावर असून, ही जबाबदारी केवळ शासकीय यंत्रणेची न राहता लोकांच्या आशा-अपेक्षांची वाहक आहे, हे लक्षात घेता महसूल दिन आणि महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सर्जनशील, गतीशील आणि सुसंवेदनशील होण्याचे स्फूर्तीदायी आवाहन केले.

प्रशासनाची खरी कसोटी ही कार्यालयीन आकड्यांत नव्हे, तर नागरिकांच्या समस्यांचे वेळीच, पारदर्शक आणि मानवी दृष्टिकोनातून होणाऱ्या निराकरणात आहे. गडचिरोलीसारख्या विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जिल्ह्यात महसूल विभागाची भूमिका भूमापनापुरती मर्यादित राहू शकत नाही, ती नियोजन, अंमलबजावणी आणि जनतेच्या विश्वासाची पूर्ती करणारं केंद्र बनली पाहिजे.

महसूल सप्ताह हा केवळ औपचारिक सप्ताह ठरण्यापेक्षा विभागाच्या कार्यसंस्कृतीत बदल घडवून आणणारा, प्रेरणादायी पर्व ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सन्मानित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी प्रशासनाच्या आत्म्याला स्पर्श करणाऱ्या सेवा कशा असाव्यात, याचे वास्तवदर्शी चित्र उभे केले. अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी ‘कलेक्टर’ हे पद केवळ प्रशासकीय नव्हे तर शासनाच्या जनतेशी असलेल्या पहिल्या नात्याचे प्रतीक असल्याचे सांगत महसूल यंत्रणेला ‘जिवंत संस्था’ म्हणत, गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांकडून शिकण्याचे आवाहन केले. उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी महसूल प्रशासनाच्या ऐतिहासिक वाटचालीचा दाखला देत, अपुरी मनुष्यबळ असूनही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समर्पणभावना ही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे आणि त्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या ही केवळ नोकरी नाही, ती सामाजिक बांधिलकी आहे, हे त्यांनी प्रभावी शब्दांत अधोरेखित केले. या कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लाभार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेचे ओळखपत्र व अंत्योदय कार्डांचे वाटप झाले. महसूल कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाच्या गांभीर्याची आणि आत्मीयतेची साक्ष होती. नायब तहसीलदार वनिशाम येरमे यांनी संयोजन केलेल्या या कार्यक्रमात महसूल विभागाचा हा दिन प्रशासनाच्या आत्मसाक्षात्काराचा आणि सेवा मूल्यांच्या नव्याने पुनर्पूजनाचा क्षण ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.