लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: सर्च (शोधग्राम) येथे सोमवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता स्व. ठाकुरदास बंग यांचा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इशा-वास्य-उपनिषद प्रार्थना म्हणून व स्व. ठाकुरदासजींच्या समाधीला पुष्प वाहून सर्वांनी आदरांजली अर्पण केली. यावेळची विशेषता म्हणजे वर्ध्याहून आलेले ठाकूरदासजी बंग यांचे जेष्ठ चिरंजीव अशोक बंग व त्यांचे कुटुंबिय डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग व त्यांचे कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशोक बंग यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून त्यांचे पिता स्व. ठाकुरदासजी बंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यानंतर लगेच 10.15 वाजता स्व. ठाकूरदासजी बंग स्मृती व्याख्यान मालेला सुरुवात करण्यात आली. ठाकुरदास बंग हे अर्थशास्त्रज्ञ होते व ग्रामीण अर्थशास्त्र हा आयुष्यभर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता त्यानुसार चेतना विकास संस्था गोपुरी वर्धा या संस्थेचे संचालक अशोक बंग यांनी ‘प्रजासत्ताक भारत कृषीक्षेत्र दशा आणि दिशा’ या विषयावर या पहिल्या व्याख्यानाचे पुष्प गुंफत विषयाची सखोल मांडणी केली. सध्याच्या शेतीची दशा काय आहे किंबहुना अवदशा कशी आणि ती का झाली, त्यामागील शासकीय धोरणे, शेतीचा उत्पादन खर्च व शेतकर्यांना मिळणारा रास्त भाव यामध्ये तफावत कशी आहे, अशी विविध माहिती व दाखले त्यांनी यावेळी दिले. पुढची शेती विकासाची दिशा काय असावी यामध्ये शेतकर्याच्या भावाला रास्त भाव, सरकारची अनुकूल भूमिका व उपाययोजना वारंवार होणे आवश्यक सध्या असलेल्या योजना तुटपुंज्या आहेत. जे उपभोग करतात किंवा ग्राहक आहेत त्यांनी सुद्धा शेतकरी हा अन्नदाता आहे व शेती आपल्या देशाचा मोठा आधार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. असे विविध उपाय त्यांनी यावेळी मांडले.
या कार्यक्रमाकरीता गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले सामाजिक कार्यकर्ते, गुरुदेव सेवा मंडळ, अनिस, जिल्हा दारूबंदी संघटना, मुक्तिपथ चे गावातील व शहर संघटनेचे कार्यकर्ते व सर्च संस्थेचे सर्व कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यापुढे दरवर्षी 27 जानेवारी ला ठाकुरदास बंग स्मृती व्याख्यान आयोजित करण्याचा मनोदय डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.
https://youtu.be/gU9KfqeLcJA