जमिन, शिक्षण व व्यवसाय आदिवासींच्या विकासाची त्रिसूत्री- अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे मत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 9 ऑगस्ट 2023 : आदिवासी समाजाने मुलांसाठी, समाजासाठी संघटित होऊन जमीन बळकवणाऱ्याकडून मिळविण्याचा प्रयत्न, शिक्षणाविषयी हक्क व कर्तव्याची जाणीव तसेच जीवनात भरीव बदल करायचा असेल तर व्यवसायाच्या पाठीमागे जाण्याचे आवाहन अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी व जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक वैभव वाघमारे यांनी स्थानिक कन्यका परमेश्वरी देवस्थानात केले.

विचार मंचावर प्रमुख वक्त्या प्राचार्य डॉ. समता कन्ना मडावी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रमेश हलामी, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई कुळमेथे , नगरसेवक विकास उईके, सेवानिवृत्त नायक तहसीलदार नारायण कुमरे, चित्तेश्वर बाबा, बुधाजी सिडाम, पोलीस पाटील दशरथ कोरेत उपस्थित होते.

वाघमारे पुढे म्हणाले, शिक्षण हे समाज विकासाचे साधन असल्याने त्यातील विद्यार्थी, शिक्षक व इतर घटकांवर नजर ठेवणे आपले कर्तव्य आहे. 2005 पूर्वीच्या वनजमीनी असतील त्यांना पट्टे देण्यात येतील.आदिवासी म्हणजे पूर्वीपासून वास्तव्य असणारे असल्याने आपल्याकडे सर्व समाजापेक्षा संपत्ती, ज्ञान, अधिकार, शिक्षण व नेतृत्व यावर प्रभुत्व असायला पाहिजे. मात्र या मुख्य प्रवाहापासून आपण दुरावल्याने शैक्षणिक प्रगती पाहिजे तेवढी झाली नाही. परिणामी नुकत्याच पोस्टाच्या दहा-बारा हजाराच्या पगार असलेल्या नोकरीमागे 90% गुण असलेले विद्यार्थी सुध्दा समाजात निर्माण होऊ शकले नाहीत.
शिक्षणासोबतच प्रगतीसाठी व्यवसायाची जोड ठेवल्याने भरीव व मोठा बदल दिसून येईल. आदिवासींनी सजग राहून शांततेने, बुद्धीच्या बळावर आपले हक्क प्रस्थापित करायला पाहिजे. प्राचार्य डॉ. समता मडावी यांनीही आदिवासींच्या उन्नतीचे मार्ग सांगितले. अध्यक्ष स्थानावरून प्रा. हलामी यांनी जागतिक आदिवासी दिन व ९ ऑगस्ट यांचे महत्त्व सांगितले.

यावेळी समाजातील दहावी, बारावी व उच्च शिक्षणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सेवानिवृत्तांचा सत्कार शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर सडमेक ,नामदेव आत्राम , वैद्यकीय अधिकारी डॉ कोमेटी दूर्वा व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे कार्यकरते तसेच नागरिकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन महेश मडावी तर आभार बापू तोरेम यांनी केले.

हे पण वाचा :-