लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, ओमप्रकाश चुनारकर : नागपूर परिक्षेत्रातील वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा ६ ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान भंडारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. सहा जिल्ह्यांच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धांत जलतरण प्रकार विशेषतः चुरशीचा ठरला. या स्पर्धेत गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील शिपाई, बैच क्र. ५५६७ बाबासाहेब विलास वासनिक यांनी अपूर्व कौशल्य सादर करत सर्व स्पर्धकांतील विशेष ठरले.
८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत वासनिक यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुरुवातीपासूनच आघाडी घेत सुवर्णपदकाची खात्री केली. त्यानंतरच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारातही त्यांनी तितक्याच आत्मविश्वासाने विजेतेपद मिळवत आपले प्रभुत्व सिद्ध केले. वैयक्तिक गटात दोन सुवर्णपदकांची कमाई केल्यानंतर त्यांनी संघात्मक स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी कायम ठेवली.
४×१०० मीटर मिडले रिले आणि ४×१०० मीटर फ्रीस्टाईल रिले या दोन्ही संघात्मक प्रकारांत सुवर्णपदक पटकावत वासनिक यांनी एकूण चार सुवर्णपदकांची चौकट नोंदवली. त्यांच्या दमदार कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याने जलतरण प्रकारातील एकूण चॅम्पियनशिप निश्चित केली. या स्पर्धांमध्ये गडचिरोलीसोबत भंडारा, गोंदिया, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांचा सहभाग होता.
भंडारा येथे झालेल्या समारोप सोहळ्यात पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी विजेत्यांना सुवर्णपदकांनी गौरवले. आपल्या यशाबद्दल बोलताना वासनिक यांनी आपल्या आई-वडिलांचे, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे तसेच प्रशिक्षण देणारे RSI सिंह आणि जंगी सर यांचे मनापासून आभार मानले.
बाबासाहेब वासनिक यांची सडेतोड, शिस्तबद्ध आणि तडफदार क्रीडा कामगिरी गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली असून, जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणादायी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांची कामगिरी जलतरण क्षेत्रातील परिश्रम, कठोर अनुशासन आणि निष्ठेची सर्वोत्तम उदाहरण म्हणून कौतुकास पात्र ठरली आहे.