लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. ४ मार्च: आलापल्ली येथील पुरातन मामा तलावाची मोजणी करण्याचे काम आज भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. त्यामुळे आता तलावाचे सीमाकंन निश्चित होणार असल्याने या तलावाला गतवैभव प्राप्त होऊन सौन्दर्यीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
आलापल्ली येथील मामा तलावाच्या जागेत मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरु असल्याची तक्रार ग्रामपंचायतकडे स्थानिक नागरिकांनी केली होती. त्याची दखल घेत आलापल्लीचे नवनियुक्त सरपंच शंकर मेश्राम यांनी तलावाची मोजणी करण्याचे ठरविले त्यानुसार भूमापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज मोजणीला सुरुवात केली.
एकेकाळी आलापल्लीची शान समजल्या जाणाऱ्या मामा तलावात मोठया प्रमाणात अतिक्रमणा सुरु झाले असून अनेक लोकांनी अतिक्रमण करून तलावाच्या पोटात घरे बांधणे सुरु केले तर काहींनी राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याने चक्क तलावाच्या पोटात शेती सुद्धा सुरु केली. अनेक जागरुक नागरिकांनी याच्या तक्रारी ग्रामपंचायतला केल्या असल्या तरी याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नव्हते. मूळ 26.3 हेक्टर म्हणजेच जवळपास अंदाजे 65 एकर मध्ये असलेल्या या विशालकाय तलावाला आज शेतबोडीसारखे रूप प्राप्त झाले आहे. आज हा तलाव जेमतेम 20 एकर शिल्लक राहिला आहे.
आजच्या मोजणीला अतिक्रमण धारकाचा विरोध होऊ नये यासाठी सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अकनपल्लीवार, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष सुरेश गड्डमवार, ग्रांप सदस्य स्वप्नील श्रीरामवार, संतोष अर्का, शंकर बोलूवार, भाग्यश्री बेझलवार, पुष्पा अलोणे, शारदा कडते, अनुसया सप्पीडवार, सुगंधा मडावी, सुमन खोब्रागडे, बेबीताई आत्राम, इत्यादी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका संध्या गेडाम, तलाठी रवी मेश्राम, तसेच जेष्ठ नागरिक सुकरू कोरेत, संतोष तोडसाम, व्येंकटी सल्लम, पराग पांढरे, जुलेख शेख, दौलत कोरेत, किशोर सडमेक आदी गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते तर भूमी अभिलेख विभागाकडून उपअधीक्षक एन जी पठाण, भूकर मापक समय्या बोमानवार, भूकर मापक विग्नेश मोरगु यांनी मोजणीचे कार्य केले.