वनविभागाची परवानगी घेउन लवकरच होणार राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सुरूवात

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 21 ऑक्टोबर :-  आष्टी ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वन विभागाकडून अडचणी येत असल्याने काम थंडबसत्यात होते. मात्र, वन विभागांकडून येत असलेल्या अडचणी दूर करून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. आज 21 ऑक्टोबर रोजी आलापल्ली येथील वनविभागाच्या विश्रामगृहात एक बैठक संपन्न झाली असून या बैठकीत केंद्र शासनाच्या वनविभागाचे नोडल अधिकारी सी.बी. टहशीलदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता विवेक मिश्रा यांच्याशी सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांची सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत त्यांनी वनविभागाची परवानगी घेऊन लवकरच कामाला सुरुवात करण्याची ग्वाही दिली.

आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाची गेल्या तीन वर्षांपासून दुरावस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचा साम्राज्य असून हा महामार्ग पुर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून 45 किलोमीटर चे अंतर कापायला दोन तासाचा वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण व्हावे यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही वनविभागाच्या जाचक अटी आणि परवानगीमुळे काम थांबले होते.

अखेर आज झालेल्या बैठकीत केंद्र शासनाच्या वन विभागाचे नोडल अधिकारी सी.बी. टहशीलदार यांनी लवकरच वन विभागाचे परवानगी घेऊन कामाला सुरुवात करणार असल्याचे ग्वाही दिली. तसेच भामरागड येथील पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याबाबत भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विनंती केली. यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता अहेरी उपविभागातील मुख्य समस्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार, मखमुर शेख, सुमित मोतकूरवार आदी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

T20 World Cup 2022:- दोन वेळचा चॅम्पियन संघ स्पर्धेतून बाहेर

highwayNationalRoadstarted soon