लग्न मोडले म्हणून तरुणीसह आईचे केले अपहरण

आरोपीला मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहनासह पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. १३ जानेवारी:- नागपूर ग्रामीण पोलिसांनी रामकृष्ण भोयर नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याशी जुडलेले लग्न मुलीच्या घरच्यांनी मोडले होते. याचा राग आल्याने रामकृष्ण याने ज्या तरुणीशी लग्न मोडले होते तिच्यासह तिच्या आईचे ही अपहरण केले.

ही घटना नागभीड़ तालुक्यातील बहार्णी येथे मंगळवारी घडली होती. या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने शर्थीचे प्रयत्न करून अपहरण महिलांची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे.

बहार्णी येथील तरुणीचे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील रुयाड येथील रामकृष्ण भोयर या युवकाशी लग्न जुडले होते. काही दिवसांपूर्वी दोघांचा साक्षगंध झाला होता. मात्र मुलांची वर्तणूक चांगली नाही अशी माहिती मुलींच्या कुटुंबियांना मिळाली. यामुळे मुलींच्या कुटुंबियांनी व तरुणाच्या कुटुंबियांना माहिती दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे रामकृष भोयर संतापला आणि संतापाच्या भरात तरुणीचे अपहरण करण्याचा कट रचला. त्यांनी त्याच्या कटामध्ये त्याच्या पाच मित्रांनाही सहभाग करून घेतले. मंगळवारी रामकृष्ण भोयर व त्याचे मित्र वाहनासह मुलीच्या गावात पोहोचले. रामकृष्ण आणि त्याच्या एक मित्राने मुलीच्या घरात प्रवेश करून तिला बळजबरीने उचलून गाडीत टाकले. हा सर्व प्रकार पाहून मुलीच्या आईने आरडाओरड करायला सुरुवात केली. यावेळी रामकृष्णने तरुणीच्या आईलाही गाडीत बसवत पळ काढला. कांपा येथे आरोपीने दुसरे वाहन उभे करून ठेवले होते. या वाहनातून रामकृष्ण हा मुलगी व तिच्या आईला घेऊन मध्यप्रदेशच्या दिशेने पसार झाले. तर रामकृष्णचे साथीदार हे दुसऱ्या वाहनाने पसार झाले.

मुलीच्या अपहरणाची माहिती पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना माहिती दिली. त्यांनी लगेच नागपूर ग्रामीण पोलिसांना माहिती देत  चंद्रपूरसह नागपूर जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी केली. केळवर पोलीस ठाणे हद्दीत  नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपींची वाहन अडविले. आरोपी रामकृष्ण भोयरसह त्याचे अन्य दोन मित्रांना अटक करून मुलगी व तिच्या आईची सुखरूप सुटका करण्यात आली.

नागभीड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपहरणासाठी  वापरण्यात आलेली दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. रामकृष्ण भोयरसह शुभम गोडबोले, शेशराज गेडेकर या तिघांना अटक करण्यात आली आहे.  तर अन्य आरोपी पसार झाले असल्याची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी माहिती दिली आहे.

पुढील तपासासाठी नागभीड पोलीस यांच्याकडे प्रकरण सोपविण्यात आले आहे.

nagpur policeRamkrushn Bhoyar