युवक काँग्रेस ठरले रुग्णांच्या नातेवाइकांचे कुटुंब; सेवार्थ भावनेने दिला मदतीचा हात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क     

गडचिरोली: आनंदाच्या प्रसंगी अनेक जण सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, कुटुंबावर आघात झाल्यानंतर आपले कुणाला म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे दु:खाच्या समयी सोबतीला असणारेच ते खरे आपले असतात, असे अनेक जण म्हणतात. हा प्रसंग सध्या कोरोना आजाराने अनेकांनी अनुभवला. असे असतानाच सामाजिक बांधिलकी जोपासत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांसाठी केलेली भोजनाची व्यवस्था खऱ्या अर्थाने रुग्णांच्या नातेवाइकांचे कुटुंब बनले आहे.

अनेकदा राजकीय पक्षांकडून प्रसिद्धीसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र, जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्यानंतर प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. यातच सर्वसामान्य माणसाला आरोग्य विषयक संदर्भ सेवा मिळणे कठीण झाले होते. वशिलेबाजी अथवा ओळखपाळख निर्माण करून संदर्भ सेवा मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करु लागले होते. यासोबतच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. कोरोनाग्रस्त रुग्णाला उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्यांच्या सोबत मदतनीस म्हणून आलेल्या नातेवाइकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

ही बाब लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. यासोबतच २४ तास रुग्णालयात रुग्णांना जे मदत पाहिजे ते देण्यात येत आहे. रुग्णाना रक्त पुरवठा, रुग्णवाहिका, जडाऊ लाकडं आदी युवक काँग्रेस मदत कार्य करत आहे. या कार्याची दखल घेत  लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून शहरातील दांपत्याना भोजन वितरणात सहभागी करून वेगळा  उपक्रम करण्यात येत आहे.

रात्री, अपरात्री रुग्णालयात रुग्ण भरती करणे तर सकळी ९ पासून पुन्हा भोजनाची तयारी करणे, अशी दिनचर्या या युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सतत मागील  महिना भरापासून करत आहे. या सेवेसोबतच नाममात्र भोजन द्यायचे नाही तर किमान पोटाला आधार होईल तेवढे जेवण द्यायचे निश्चित केले. मात्र, हा खर्च पेलायचा, असा प्रश्न या युवकांसमोर उपस्थित झाला. त्यावर साधकबाधक चर्चा करून अखेर भोजन वितरण करण्याचे ठरले. त्यानुसार आजतागायत २१ दिवस पूर्ण होऊन हा उपक्रम सुरू आहे. यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना ही भोजन वितरण व्यवस्था आपले कुटुंबच वाटू लागले आहे.

भोजन वितरण करण्याचा कालावधी जवळपास निश्चित करण्यात आला आहे. या वेळेत शेकडो नातेवाइकांना भोजन हवं असताना कुठलाही गोंधळ न करता शांततेत रांगा लावून भोजणाचा लाभ घेत आहेत. अनेक जण भोजण हाती घेतल्यानंतर पैसे समोर करतात. मात्र, जेव्हा पैसे घेतले जात नाही तेव्हा ते कृतज्ञतेने आभार मानून निघून जातात. दुसऱ्या दिवशी तेच नागरिक स्वतः सह इतरांना शांतता बाळगून भोजनाचा आस्वाद घेण्याचा सल्ला देत युवकांचे आभार मानतात.

ही किमया जिल्हा युवक काँग्रेसने करून दाखविली आहे. यात विशेष बाब म्हणजे अनेकांना दुपारच्या वेळी चहा-नास्ता अपेक्षित असते. मात्र, चहा टपरी बंद राहत असल्यामुळे अनेकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही समस्या लक्षात घेऊन युवक कॉंग्रेसने दुपारी चहा- बिस्कीट देण्याचा निर्णय घेतला व ते सुरू केले. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना युवक काँग्रेसची सेवा ही आपले कुटुंब वाटू लागले आहे.

याकरिता रजनीकांत मोटघरे, गौरव ऐनप्रेड्डीवार, संजय चन्ने, तौफिक शेख, घनश्याम मुरवतकर, डॉ. मेघा सावसागडे, समीर ताजणे,  विनोद धंदरे, कुणाल ताजने, दिलीप चोधरी, रवी गराडे, प्रतिक बारसिंगे, घनश्याम वाढई, गौरव अलाम, रोहीत निकुरे, विपूल येलटीवार, शरद भरडकर, प्रेम गोंगल आदी युवक सहकार्य करीत आहेत.

हे देखील वाचा :

(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 567 जागांसाठी भरती

ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवर नौकरीची संधी

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

 

 

lead storyyouth congress gadchiroli