लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 15 एप्रिल : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना गुरुवारी रात्री चेंबूरमध्ये संतप्त आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला सामोरे जावे लागले. चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यासाठी खासदार शेवाळे आले होते, परंतु त्यांना हजारो भीमसैनिकांनी गेटजवळच रोखून धरले. ‘तुझी लायकी नाही बाबासाहेबांना हार घालायची! चालता हो !’ असे म्हणत भीमसैनिकांनी शेवाळे यांना अक्षरश: हाकलून लावले. त्यांचा संताप पाहून शेवाळे यांना घाम फुटला. काही अनुचित घडण्यापूर्वीच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या घटनेच्या धास्तीने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या उद्यानातील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात हजारो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. गुरुवारी रात्री 9.30च्या सुमारास स्थानिक खासदार राहुल शेवाळे हे सुद्धा तिथे आले. बाबासाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते पुढे जात असतानाच भीमसैनिकांनी त्यांना रोखले. त्यांना पुष्पहार अर्पण करण्यास मनाई करत गद्दारांना येथे थारा नाही, असे ठणकावले. भीमसैनिकांचा रुद्रावतार पाहून शेवाळेंबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडाली. सुरक्षेचा विचार करून तिथून माघारी जाणेच योग्य असल्याचे पोलिसांनी शेवाळे यांना सांगितले.
हे पण वाचा :-