लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रासह, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सोयाबीन आणि इतर काही पिकांच्या खरेदीला मुदत वाढ केल्याची घोषणा केली होती. यानुसार राज्यात २४ दिवसांसाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र सोयाबीन खरेदीला केंद्र शासनानं दिलेली २४ दिवसांची मुदतवाढ ही केवळ ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच असल्याचं पणन विभागानं स्पष्ट केलं आहे.
सुरुवातीला बारदाना नसल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदी रखडली होती. त्यावेळी राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्रानं सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली होती. पहिल्या खरेदीची मुदत १२ जानेवारी पर्यंत होती, त्यानंतर ही मुदत केंद्र सरकारनं ३१ जानेवारीपर्यंत वाढवली. त्यानंतर पुन्हा ही मुदतवाढ ६ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली. मुदत संपल्यानंतर खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकर्यांची नाफेडने सोयाबीन खरेदी केली नाही. सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागानं केंद्र सरकारला पाठवला होता. मात्र आता मुदत वाढ मिळणार नाही अशी माहिती पणन विभागानं समाजमाध्यमावर प्रसारित केली आहे.