लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मुख्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील दारू विक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात गाव संघटन व मुक्तीपथ टीमला यश आले आहे. या संयुक्त कारवाईत दारू गाळण्यासाठी टाकलेला जवळपास 56 ड्रम गुळाचा सडवा नष्ट करण्यात आला.
आलापल्ली हे तालुक्यातील मुख्य गाव आहे. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने कारवाई देखील करण्यात आली.
गावातील दारूविक्री चे व व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. परंतु, मुजोर विक्रेते जंगलपरिसर व नदी – नाल्यांचा आधार घेऊन गुळाची दारू गाळतात व विक्री करतात. यासाठी वृक्षांची कत्तल केली जात असल्याने वनसंपदेचे सुद्धा नुकसान होत आहे. ही बाब लक्षात येताच यापूर्वी नाल्यालगत लावलेल्या हातभट्टी व हजारोंचा सडवा वनविभागाने नष्ट केला होता. तरीसुद्धा विक्रेते हातभट्टी लावन्याचे ठिकाण बदलवून मोठ्या प्रमाणात गुळाचा सळवा टाकतात. अशातच नाल्यालगतच्या जंगलपरिसरात विक्रेत्यांनी गुळाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार 18 जानेवारी ला गाव संघटन व मुक्तीपथने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली, असता जवळपास 56 ड्रम गुळाचा सळवा मिळून आला. यावेळी दारू गाळन्याचे साहित्य, सळवा असा हजारोंचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.