साडेतीन वर्षांची आरोही… तिच्या नाजूक श्वासांवर धावला ‘छोटा हत्ती’ — एका कुटुंबाचं भवितव्य उद्ध्वस्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओमप्रकाश चुनारकर,

गडचिरोली, २४ जून : एकीकडे आपल्या मुलीचं आरोग्य तपासून येण्यासाठी निघालेलं एक लहानसं कुटुंब… आणि दुसरीकडे भरधाव वेगात आलेला ‘छोटा हत्ती’ टेम्पो — या दोन टोकांमधला एक क्षण… आणि साडेतीन वर्षांची आरोही काळाच्या उदरात कायमची विरघळली. अहेरी तालुक्यातील येलचील पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडलेला हा हृदय पिळवटून टाकणारा अपघात केवळ काळे कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण परिसराच्या काळजावर घाव घालणारा ठरला आहे.

विशाल काळे — लॉयड मेटल एनर्जी लिमिटेड या कंपनीत वाहनचालक. पत्नी आणि साडेतीन वर्षांच्या चिमुरडी आरोहीसह एटापल्लीहून अहेरीकडे आरोग्य तपासणीसाठी निघाले होते. वाटेत येलचील गावाजवळ अचानक एका छोटा हत्ती टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची ती तीव्रता एवढी होती, की आरोही गंभीररीत्या जखमी झाली. प्रसंगावधान राखत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त वाहन व चालकास ताब्यात घेतलं. कुटुंबाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात टायगर ग्रुप मार्फत दाखल करण्यात आलं; परंतु डॉक्टरांनी आरोहीला मृत घोषित केल्यावर संपूर्ण कुटुंब कोसळूनच पडलं.

आई-वडिलांचा आक्रोश, रुग्णालयाच्या भिंतींवर घुमणारा शोक, आणि निष्प्राण आरोहीचा चेहरा — हे दृश्य पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांतून अश्रू थांबेनात. आरोहीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नंतर पालकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. यासंदर्भात अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल अकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या भाग्यश्री आत्राम आणि शाईन हकीम यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी दांपत्याची चौकशी केली, आणि मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोहीच्या जाण्यानं काळे कुटुंबावर जणू आभाळच कोसळलं आहे. एका पित्याचं स्वप्न, एका आईचं भविष्य, आणि एका घराचं हास्य कायमचं थांबवून टाकणारी ही दुर्घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली आहे.

ही घटना अपघात की व्यवस्थेची बेजबाबदार चाल? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. अहेरी-एटापल्ली मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांवर सावधगिरीचे फलक, वाहनांची गतीमर्यादा, चालकांच्या वैद्यकीय व मानसिक चाचण्या आणि नियमित वाहन तपासणीसारख्या उपाययोजना किती प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, याचा आता गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

गावकऱ्यांमध्ये एकच भावना दाटून आली आहे — जर बेजबाबदार वाहतुकीच्या नावाने निरागस जीव जात असेल, तर हे विनाशाचं निमंत्रणच आहे. आरोही गेली, पण तिच्या मृत्यूने निर्माण झालेला आक्रोश आणि अस्वस्थ शांतता हा केवळ काळे कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा इशारा आहे.

 

accidentTempo accident