अवघ्या 15 दिवसांत 3 सख्ख्या भावांचा कोरोनाने निधन, उद्धवस्त झालं कुटुंब

पुणे जिल्ह्यातील कारेगाव याठिकाणी अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

कारेगाव, 08 मे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाटअत्यंत घातक ठरत असून यामध्ये अनेकांचे प्राण जात आहेत. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील तीन सख्ख्या भावाचा कोरोनानं निधन झाला. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांत संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. या घटनेमुळं गावात हळहळ व्यक्त केली जात असून पीडित कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कारेगाव येथील नवले मळ्यात राहाणाऱ्या नवले भावंडाना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तालुक्यातील विविध खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान प्रकृती खालावल्यानं तिन्ही भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 23 एप्रिल रोजी सर्वात थोरला भाऊ पोपट नवले (वय-58) यांचं निधन झालं.

थोरल्या भावाची मृत्यूची घटना ताजीचं असताना, अवघ्या चार दिवसांनी 27 एप्रिल रोजी मधला भाऊ सुभाष नवले (वय- 55) याचं निधन झालं. कोरोना विषाणूच्या या दुहेरी आघातानं नवले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे सर्वात धाकड्या भावाला वाचवण्याची धडपड सुरू झाली. पण नियतीसमोर त्यांना हार पत्करावी लागली. 6 मे रोजी धाकटा भाऊ विलास नवले यांचंही निधन झालं. अवघ्या 15 दिवसांत तीन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कारेगावात शोककळा पसरली आहे.