लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी आरमोरी येथे असलेल्या Hero कंपनीच्या शोरूमची इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमी सर्वजण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर शोरूम ही गडचिरोली येथील मुख्य डीलर मालकाने सब-डीलरला चालविण्यास दिली होती. नगरपरिषदेकडून कमकुवत बांधकाम असल्याची नोटीस मिळूनही शोरूम मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अमोल मारकवार तात्काळ घटनास्थळी पोहोचले व परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून मुख्य डीलर व सब-डीलर दोघांवरही कामगारांच्या जीवाशी खेळल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांना व जखमींना त्वरीत आर्थिक मदत जाहीर करण्याचे आवाहन केले.
कॉ. मारकवार यांनी तीव्र संताप व्यक्त करताना सांगितले की, “जर Hero कंपनी अशा प्रकारे डीलरशिप देते, तर इमारतींची व सुरक्षिततेची तपासणी करणे बंधनकारक असायला हवे. या घटनेत मुख्य डीलर व सब-डीलर यांचा बेजबाबदारपणा जितका कारणीभूत आहे, तितकीच Hero कंपनीचीही जबाबदारी आहे. त्यामुळे कंपनीवरही गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई वसूल करावी.”
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या मागणीला शेतकरी कामगार पक्ष व आजाद समाज पार्टी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. जर त्वरीत कठोर कारवाई झाली नाही तर तिन्ही पक्ष एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा कॉ. अमोल मारकवार, भाई रामदास जराते व राज बन्सोड यांनी दिला.
या घटनेने आरमोरी परिसरात संतापाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकही दोषींवर कडक कारवाईची मागणी करत आहेत.
उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची भीषण धडक; आठ वर्षीय शौर्यचा जागीच मृत्यू, वडिलांचा हात-पाय मोडला
रक्षाबंधनाच्या दिवशी कारमपल्लीचा पहिला वीज अभियंताचा पाण्यात बुडून मृत्यु..