गडचिरोली- चंद्रपूर सीमेवरील वैनगंगा नदीत तिघे मेडिकल शिकावू डॉक्टर बुडाले, शोधकार्य सुरू..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळीसाठी गेलेल्या MBBS शिकणाऱ्या तिघा युवकांचा नदीच्या पात्रात बुडून अपघात झाल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून सध्या घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली मेडिकल कॉलेजचे जिल्हा रुग्णालयात शिकावू डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले आठ युवक आज सुट्टीचा दिवस असल्याने वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र, यामध्ये गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे हे तिघे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अचानक खोल पात्रात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप पुलरवार आपल्या चमूसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस यांच्याकडून शर्तीचे शोधकार्य सुरू आहे.

विशेष म्हणजे, याच वैनगंगा नदीपात्रात यापूर्वीही चंद्रपूर येथील तीन बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटनेतील अधिक माहिती प्रतीक्षेत असून शोधकार्याला वेग देण्यात आला आहे.