लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १६ जून : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातून तीन आदिवासी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा मार्ग खुला करत NEET परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं आहे. कारमपल्ली येथील देवदास मंगू वाचामी, मल्लमपोडूरची सानिया तुकाराम धुर्वे आणि दुब्बागुड्याचा गुरुदास गिसू मिच्चा यांनी यंदाच्या NEET २०२५ च्या निकालात अनुक्रमे ४७२, ३६४ आणि ३४८ गुण मिळवत जिल्ह्याचं नाव उज्वल केलं आहे.
हे तिघंही विद्यार्थी आदिवासी विकास विभागाच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले आहेत. सानिया आलापल्ली येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून गुरुदासने सिरोंचातील ज्ञानदीप हायस्कूलमधून दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तिघांनीही धाराशिव जिल्ह्यातील ‘उलगुलान’ या संस्थेच्या मार्गदर्शनात NEET साठी तयारी केली होती.
या यशाबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागडच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांनी सानियाशी संवाद साधला असता, शहरात न जाता आपल्या गावातच डॉक्टर म्हणून सेवा देण्याची तिची इच्छा असल्याचं तिनं सांगितलं. देवदास आणि गुरुदास यांनीही गावातच आरोग्यसेवा देण्याची भूमिका मांडली. अधिकाऱ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात कोणतीही अडचण आल्यास प्रशासनाच्या वतीने पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं.
या तिन्ही विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे. देवदास आणि गुरुदास यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर सानियाचे वडील मल्लमपोडूर येथील सूरजागड लोहखनिज प्रकल्पात ट्रक चालक म्हणून काम करतात. घरच्या अडचणींना न जुमानता आणि शैक्षणिक साधनसंपत्ती फारशी नसतानाही या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश संपूर्ण गडचिरोलीसाठी प्रेरणादायी ठरलं आहे.
हे विद्यार्थी माडिया या अतिमागास आदिवासी जमातीचे असून, त्यांच्या यशामुळे आदिवासी समाजात शिक्षणाविषयी नव्याने आशा निर्माण झाली आहे. त्यांच्या या टप्प्यांमुळे अनेक दुर्गम भागांतील विद्यार्थीही मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस करतील, अशी अपेक्षा आहे.