लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली तालुक्यातील वाकडी परिसरात रानटी हत्तींच्या धुमाकळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी साडे दहाच्या सुमारास कृपाळा गावाजवळ घडलेल्या हल्ल्यात तीन महिला गंभीर जखमी झाल्या. या महिलांमध्ये सुशीला टेमसू मेश्राम, योगीता उमाजी मेश्राम आणि पुष्पा निराजी वरखडे यांचा समावेश आहे. यातील सुशीला मेश्राम यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले आहे. अन्य दोघींची गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मागील तीन-चार दिवसांपासून गडचिरोली तालुक्यातील वाकडी, म्हसली, कृपाळा व हिरापूर परिसरात सुमारे १८ रानटी हत्तींचा कळप मुक्त संचार करीत आहे. या काळात त्यांनी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर धानपिकांचे नुकसान केले असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.
शनिवारी सकाळी कृपाळा गावातील काही महिला गावाजवळील नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असताना, अचानक हत्तींच्या कळपाने त्याठिकाणी प्रवेश केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिलांमध्ये गोंधळ उडाला. यावेळी काही हत्तींनी थेट महिलांवर हल्ला चढवला. सुशीला मेश्राम यांना जोरात धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर अन्य महिलांनाही दुखापत झाली.
दुसरीकडे, हत्तींच्या या हल्ल्यामुळे शेतांतील उभे धानपिक देखील चिरडले गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची तसेच रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, सततच्या या घटनांमुळे वाकडी व आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे ठरविले आहे. वनविभागाकडून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, या कळपाला सुरक्षितरित्या जंगलात परतवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.