लोकस्पर्श न्युज नेटवर्क
भंडारा 27 जानेवारी :- सायंकाळच्या सुमारास दुचाकीने चौकातून घराकडे परतणाऱ्या एका १६ वर्षीय बालकाच्या गळ्यावर नायलॉन मांजा आल्याने बालक गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथील टी पॉइंट चौकातील वनविभाग कार्यालयासमोर घडली असून रुद्रा तुळशीदास तोंडरे (१६) रा लाखांदूर असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.3
रुद्रा घरी वडिलांना पाणीपुरी खायला जातो असे सांगून चौकात आला. चौकात आपले कामकाज आटोपून दुचाकीने घराकडे परत जात असताना तुटलेल्या पतंगीचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यावर आला. गळ्यावर काहीतरी असल्याचे जाणवतात रुद्राने आपली दुचाकी थांबविली मात्र नायलॉन मांजा पकडलेल्या अन्य एकाने तुटलेली पतंग मिळण्यासाठी नायलॉन मांजा ओढला. यात रुद्राच्या गळ्यावर गंभीर जखम झाली. रुद्राच्या गळा जवळपास ७ सेंटीमीटर कापला गेला. ही घटना वनविभाग कार्यालय समक्ष घडली तर तेथे उपस्थित कर्मचारी एस जी खंडागळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ रुद्राला उपचारासाठी लाखांदूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
रुद्रावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मकरसंक्रांत संपून जवळपास आठवडा लोटला असताना देखील स्थानिक लाखांदुरात नायलॉन मांजाची विक्री अजूनही जोमात सुरू आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी पालकांसह नागरिकांनी केली आहे.
हे पण वाचा :-