इंजेवारीत वाघाचा पुन्हा प्राणघातक हल्ला — महिला ठार; सावधगिरीचा इशारा असूनही वनविभागाचे दुर्लक्ष?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी गावात आज दुपारी वाघाच्या पुन्हा झालेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण परिसर भीतीने स्तब्ध झाला. शेतात नियमित काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत कुंदा खुशाल मेश्राम (६३) यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच पतीचे निधन झालेले, मागे एक मुलगा आणि तीन मुली असलेले कुटुंब या घटनेने हादरून गेले आहे.

ही भीषण घटना शेततलावाजवळील पाणी वाहून जाणाऱ्या अरुंद वाटेवर घडली. सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे त्या खुरपणीसाठी शेताकडे गेल्या होत्या. दुपारी सुमारे ४ वाजता नातू किसन त्यांना आणण्यासाठी शेतात गेला, मात्र त्या कुठेही दिसत नसल्याने त्याने धाव घेत घरी येऊन इतरांना कळविले. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला असता शेततलावापासून काही अंतरावरच अत्यंत विदारक अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच आक्रोश उसळला.

मृतदेहावरील खोल ओरखडे, रक्ताचे ठसे आणि आसपास दिसणारे पावलांचे ठसे पाहता वाघ बराच वेळ गवतात लपून बसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गावात भीतीचे सावट अधिक गडद झाले असून महिलांना आणि शेतकऱ्यांना उघड्या माळावर जाणेही धोक्याचे ठरू लागले आहे.

आरमोरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांत वाघांच्या हालचालीत लक्षणीय वाढ झाली असून, या परिस्थितीबाबत माकप आणि शेकापने पूर्वीच वनविभागाला औपचारिक इशारा दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र आवश्यक ती खबरदारी न घेतल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे.

घटनेनंतर वन अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु फोन न लागल्याने अधिकृत माहिती अथवा तत्काळ कारवाईबाबत स्पष्टता मिळू शकली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “वनविभागाची सतर्कता केवळ कागदावरच? नागरिकांच्या सुरक्षेला नेमके प्राधान्य कुठे?” असा रोषपूर्ण सवाल उपस्थित केला जात आहे. गावकऱ्यांनी तातडीने वाघाचा बंदोबस्त, पिंजरा उभारणी, सततची गस्त आणि संवेदनशील भागांमध्ये निगराणी वाढविण्याची मागणी केली आहे.

कुंदाबाईंचा मृत्यू हा एका कुटुंबावर कोसळलेल्या दु:खापुरता मर्यादित नसून, या भागातील वाढत्या वन्यजीव–मानव संघर्षाच्या गंभीर वास्तवाचा आणखी एक वेदनादायी पुरावा आहे. इंजेवारीसह संपूर्ण आरमोरी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ आणि ठोस उपाययोजना आता अत्यंत आवश्यक बनल्या आहेत.

Gadchiroli breakingHinjwadi accidentTager kill womanTiger kill woman
Comments (0)
Add Comment