महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हदगाव येथील पुरातन श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व व कलशारोहण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भ व महाराष्ट्रातील ठीक ठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते.

वैराग्यमूर्ती मठाधिपती महंत  योगी बापू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर माहूर पिठाधीश कवीश्वराचार्य माहुरकर बाबा यांच्यासह परिसरातील मठाधिपती धर्मपीठावर विराजमान होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या या मठाधिपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महानुभाव पंथीयांसाठी केलेल्या कार्यकर्तृत्वाला लक्षात घेऊन स्तुती सुमनांनी साकारलेले सन्मानपत्र बहाल केले.

फडणवीस यांनी सर्वप्रथम चक्रधर स्वामींना दंडवत घातला. त्यानंतर धर्मपीठावरून बोलताना सर्वज्ञ चक्रधर स्वामी व त्यांच्या अनुयायांनी अतिशय विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचे कार्य केल्याचे स्मरण केले. महानुभव पंथीयांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी गौरव केला. परकीय आक्रमणामुळे कृष्णदेवाची पूजा करून घेणे, हिंदू म्हणवून घेणे कठीण होते. त्या काळात चक्रधर स्वामीनी जातीपाती, पंथाचा विचार न करता महानुभव दाखवला, समरसता व समतायुक्त समाज त्याकाळी देशात निर्माण केला.