चवदार तळे सत्याग्रह दिनाचा ९४ वा वर्धापन दिन शासनाचे नियम पाळून झाला साजरा!

  • चवदार तळ्यावर गर्दी न करण्याचे आंबेडकरी जनतेचे अवाहन.
  • केवळ स्थानिकांनाच मिळणार अभिवादन करण्याची संधी.
  • विवीध रंगाच्या विद्युत रोशनाईचा चवदार तळ्यावर झगमगाट.
  • आंबेडकरी अनुयायी, लोकप्रतीनिधींनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन.
  • ओजळभर पाणी प्राशन करून दिला सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जिल्हा उपसंपादक – सचिनकुमार कांबळे

विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे पाणी पिण्यासाठी चवदार तळ्याच्या सत्याग्रह केला होता. त्यानंतर अनेक वर्षं हा दिवस ‘समता दिन’ तसंच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांनी सर्व सामन्यासाठी लढा उभारून सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहात तीन हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे. ‘आम्हीही माणसे आहोत’ हे जगाला ठणकावून सांगण्यासाठीचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही. त्यामुळे या महाडच्या सत्याग्रहाचं मोल आजही अधोरेखीत होतंय.

महाड, दि. २० मार्च:   विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी प्राशण करून सर्व मानव जातीला पाण्याचा हक्क खुला करून सामाजिक क्रांती घडवून आणली आहे. 

चवदार तळ्याचा हा सत्याग्रह दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा ओंजळभर पाणी प्राशन करून चवदार तळे सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन आंबेडकरी अनुयायी महाडला येतात आणि बाबासाहेबांची आठवण करून ओंजळभर पाणी प्राशन करतात.   

चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने दरवर्षी २० मार्च रोजी चवदार तळे परीसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चवदार तळ्यावर येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. या वर्षी नियम आणि अटी घालुन केवळ स्थानिकांना अभिवादन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सभा घेण्यास बंदी घातली असून गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे. चवदार तळे सत्याग्रहाच्या ९४ व्या वर्धापन दिना निमित्ताने चवदार तळ्याच्या चहू बाजुने मनमोहक अशी विद्युत रोशनाई करण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभुमीवर चवदार तळे सत्याग्रहाचा ९४ वा वर्धापन दिन अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. प्रशासन आणि आंबेडकर विचाराच्या संघटनांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अभिवादन करण्यासाठी चवदार तळे परीसरात कोणीही गर्दी केली नाही. आंबेडकरी अनुयायी, लोकप्रतिनिधींनी गर्दी न करता पुष्पहार अर्पण करीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.

बाबासाहेबांनी ज्या पायरीवर उतरुन चवदार तळ्याचे पाणी प्राशन करीत सत्याग्रह केला. त्याच पायरीवर उतरून चवदार तळ्याचे पाणी ओंजळीत घेत आंबेडकरी अनुयायानी चवदार तळे सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या केल्या. या दरम्यान गर्दी होऊ नये कोरोना संसर्ग रोखण्याचे नियम पाळले जावेत यासाठी महाड नगरपालिका आणि शहर पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. यावेळी होणाऱ्या सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या अभिवादन सभा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे १९ मार्च रोजी महाड क्रांतीभूमीत होणारी भीमसैनिकांची गर्दी यावर्षी मात्र दिसून आली नाही. कोणत्याच प्रकारचे मंडप, फलक नसल्याने क्रांतीस्तंभ, चवदार तळे या ठिकाणी शुकशुकाट पसरला आहे.  

chavdar tale satyagrah