भंबारा नाल्यावर नव्या पुलामुळे वाहतूक सुरळीत; आलापल्ली–सिरोंचा मार्ग खुला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २४ जून : अखेर आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील भंबारा नाल्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या (सिरोंचा पुलिया) पुलावरून वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे पुलाजवळील तात्पुरता रपटा वाहून गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, प्रशासन व संबंधित कंत्राटदाराच्या तत्परतेमुळे ही अडचण काही तासांतच दूर करण्यात आली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या या भागात श्री स्वामी समर्थ इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीमार्फत पुलाच्या शेजारील मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. रात्रभर झालेल्या पावसाने पुलाच्या खालून जात असलेला तात्पुरता मार्ग पूर्णतः वाहून नेल्याने सोमवार रात्रीपासून आलापल्ली–सिरोंचा मार्ग बंद झाला होता. मात्र, कंपनीने वेळ न दवडता दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली. अवघ्या दोन तासांत वाहतुकीसाठी योग्य रस्ता पुन्हा तयार करण्यात आला आणि मार्ग पूर्ववत खुला करण्यात आला.

या वेगवान कृतीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळली असून विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग सुरू राहणं ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. आदिवासी भागांतील दळणवळणाच्या दृष्टीने आलापल्ली–सिरोंचा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हा मार्ग पुन्हा खुला झाल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत निर्देश दिले होते की, “पावसाळ्याच्या काळात कुठल्याही भागात वाहतुकीचा अडथळा होऊ नये,” आणि प्रशासनाने ती सूचना प्रत्यक्ष कृतीत उतरवली असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

या कार्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता रुषिकांत राऊत, कनिष्ठ अभियंता अमित रामटेके, तसेच श्री समर्थ स्वामी इंजिनिअर्स लिमिटेडचे प्रकल्प व्यवस्थापक ज्ञानेश्वर गोंड, तंत्रज्ञ श्रीनिवासराव सांगेनेडी आणि विक्रांत गुरव यांनी अथक मेहनत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखालील त्वरित कृतीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद उमटत असून, नागरिकांनी या कार्याचे कौतुक केले आहे.

हा पुल केवळ एक संरचना न राहता, लोकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा दुवा बनला आहे. प्रशासनाच्या तत्परतेमुळे पावसाळ्यातील भीतीचे सावट दूर होऊन एक सकारात्मक संदेश जिल्ह्याला मिळाला आहे.

Allapali sorincha roadHighway roadsironcha road