पदोन्नतीतून बदलीचा फटका; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमुळे गडचिरोली जिल्ह्यावर अन्यायाचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेला आधीच मनुष्यबळाची तीव्र कमतरता भासत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर त्यांना अन्य विभागात पदस्थापना देण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पदोन्नती मिळालेल्या वैद्यकीय अधिकारी गट-ब मधील अधिकाऱ्यांना गट-अ पदावर बढती देताना त्यांची बदली इतर महसूल विभागात करण्यात आल्याने जिल्ह्यावर अन्याय होत असल्याची भावना संबंधित अधिकाऱ्यांमध्ये व्यक्त होत असून इच्छुक अधिकाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्यातच पदस्थापना देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्याच्या टोकावर व दुर्गम भौगोलिक परिस्थितीत वसलेल्या या जिल्ह्यात नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आजही मोठे आव्हान ठरत आहे. शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील अपुरे मनुष्यबळ, ग्रामीण भागातील अज्ञानता, अंधश्रद्धा व बुवाबाजी यांसारख्या कारणांमुळे नवजात शिशू मृत्यू आणि प्रसूतीनंतर मातामृत्यूच्या घटना अद्यापही पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर अनुभवी व स्थानिक परिस्थितीची जाण असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

प्रत्यक्षात दुर्गम व नक्षलप्रभावित भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्यासाठी अनेक डॉक्टर तयार नसल्याचे वास्तव कायम आहे. बदली झाल्यानंतरही अनेक वैद्यकीय अधिकारी येथे रुजू होण्यास टाळाटाळ करतात किंवा अल्प कालावधीत पुन्हा बदली मिळवून जिल्हा सोडतात. अशा परिस्थितीत दीर्घकाळ जिल्ह्यात कार्यरत राहून स्थानिक परिस्थितीची सखोल माहिती असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी गट-ब अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर इतर विभागात पाठविण्याचा निर्णय आरोग्य सेवेवर उलट परिणाम करणारा ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.

जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांची एकूण ७८ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ५१ पदे भरलेली आहेत, तर २७ पदे रिक्त आहेत. आधीच मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर पाठविल्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळाची तूट आणखी वाढणार असून ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे शासन खरोखरच जिल्ह्यातील आरोग्य समस्या सोडवण्याबाबत गंभीर आहे का, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे.

मागील दहा ते पंधरा वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत राहून स्थानिक भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक रचना आणि आरोग्य व्यवस्थेतील अडचणींची प्रत्यक्ष अनुभूती असलेल्या अधिकाऱ्यांना विशेष बाब म्हणून याच जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी गट-अ पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी पदोन्नती झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी स्थानिक परिस्थितीची जाण असलेल्या अनुभवी डॉक्टरांना टिकवून ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

Gadchiroli doctorGadchiroli health issues
Comments (0)
Add Comment