गोंडवाना विद्यापीठाचे स्थानांतरण खपवून घेतल्या जाणार नाही – आ. डॉ. रामदास आंबटकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ जानेवारी: गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या स्थानांतरणाची मागणी चंद्रपूर येथील लोकप्रतिनिधींनी केल्याची चर्चा होत असून शासनाने जर असा कुठलाही प्रयत्न केला तर तो गडचिरोली जिल्ह्यावर अन्याय होईल. महाराष्ट्राच्या टोकावर असलेले दुर्गम, अविकसित, आदिवासी जिल्ह्याच्या विकासाचा उद्देश समोर ठेवून ज्या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली तेथील जनतेच्या भावनांचा अनादर करून उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. असा प्रयत्न या जिल्ह्याची जनता खपवून घेणार नाही यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी दिला आहे.

आ. डॉ. रामदास आंबटकर म्हणाले की, काही दिवसातच गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ होऊ घातला आहे. स्थापनेपासून आज पाहतो हा समारंभ गडचिरोलीतच झालेला आहे व तसा पायंडाही आहे. विद्यापीठ भवनात, परिसरातच दीक्षांत समारंभ करायचा असतो. मग आता असे काय झाले की, गडचिरोली विद्यापीठ स्थान असतांना दिक्षांत समारंभ चंद्रपूर येथे होत आहे. हा त्या स्थानाचा आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचा अनादर करण्यासारखे आहे. मा. राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करून हा दीक्षांत समारंभ रद्द करून समारंभ गडचिरोलीत होईल असे करावे.

वास्तविक पाहता गडचिरोली नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र म्हणून शासनाने मान्यता दिली होती. शिक्षणाच्या कक्षांचा विस्तार जसा होत गेला तसे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाच्या संदर्भात नवीन महाविद्यालय आणि अन्य गतिविधि शासनामार्फत करण्यात आल्या यात गडचिरोली एक अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने येथे विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाले. या काळात सिनेट, व्यवस्थापन परिषदेत मी आग्रहपूर्वक १० वर्ष सतत पाठपुरावा करून उपकेंद्रात काही विषयविभाग व जमीन मिळविली व विद्यापीठ म्हणून मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. त्यात मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रत्यक्ष गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाले. या सर्व प्रयत्नात गडचिरोली जिल्ह्यातील विद्यापीठ संघर्ष समिती, लोकप्रतिनिधी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकसंस्था चालक, पत्रकार व जिल्ह्यातील जनतेने मोठा सहभाग दिला आहे. आज विद्यापीठ विकासाकडे वाटचाल करीत असतांना काही मंडळी राजकीय हेतूने विद्यापीठाच्या स्थान तरुणाची मागणी करीत आहे. त्यावेळी ही मंडळी कुठे होती असा प्रश्न पडतो. त्यामुळे विद्यापीठाच्या विकासाकडे सरकारने लक्ष द्यावे. असे आवाहनही त्यांनी  पत्राद्वारे केले आहे.

Ambatkar