कमलापूर हत्ती कॅम्पचा कायापालट; पर्यटनाला नवी दिशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर परिसराला लवकरच विकासाची नवी ओळख मिळणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेल्या या हत्ती कॅम्पमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असतानाच, त्या त्रुटी दूर करून कॅम्पचा सर्वांगीण कायापालट करण्याची ग्वाही माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.

कमलापूर हत्ती कॅम्पला दिलेल्या भेटीदरम्यान आमदार आत्राम यांनी कॅम्पमधील हत्तींची पाहणी केली. स्वतः आपल्या हातांनी हत्तींना केळी चारत त्यांनी वन्यजीवांविषयीचे ममत्व आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. या भेटीदरम्यान त्यांनी पर्यटकांशी संवाद साधत पर्यटन विकास, वनसंवर्धन आणि स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगार संधींबाबत सखोल चर्चा केली.

या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत नैनगुंडम ते तोंडेर या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. घनदाट जंगलातून जाणाऱ्या या मार्गावर आजवर पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना ५ ते ६ किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात गर्भवती महिला आणि रुग्णांना बांबूच्या झोळीतून वाहून नेण्याची वेळ येत होती. आमदार आत्राम यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून हा रस्ता साकार होणार असून, त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

यानंतर त्यांनी शासकीय हत्ती कॅम्प परिसरात सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यामध्ये पर्यटकांसाठी पगोडी, पार्किंग शेड, मुख्य प्रवेशद्वारापासून तलावापर्यंत अंतर्गत रस्ते, तसेच रेपनपल्ली ते कमलापूर हत्ती कॅम्प मार्गावर स्वागत कमानीसह सौंदर्यीकरणाची कामे प्रस्तावित आहेत.

यावेळी सिरोंचाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चा करत आमदार आत्राम यांनी कॅम्पमधील सुविधा, व्यवस्थापन आणि भविष्यातील विकास आराखड्याची माहिती घेतली. आवश्यक त्या सोयीसुविधांचा सविस्तर आराखडा तयार करून कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक विष्णुवर्धन रेड्डी, कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.जी. गडमडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, सरपंच रजनिता मडावी, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, राकॉचे कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, बानय्या जनगाम,महेश गुंडेटीवार, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कमलापूर हत्ती कॅम्पच्या विकासामुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर हा परिसर अधिक ठळकपणे अधोरेखित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments (0)
Add Comment