-व्यसनी रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन
गडचिरोली : मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहेरी, चामोर्शी तालुक्यात दर शुक्रवारी तालुका क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. २२ जानेवारी रोजी तालुका कार्यालयात आयोजित क्लिनिकला एकूण ३३ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला. दारूमुक्त होण्याची इच्छा असणाऱ्यांनी तालुका क्लिनिकला किंवा गाव पातळीवरील शिबिराला भेट देऊन उपचार घेण्याचे आवाहन मुक्तिपथने केले आहे.
आलापल्ली शहरातील होंडा शो रूम जवळील मुक्तिपथ तालुका कार्यालयात १८ रुग्णांनी व चामोर्शी येथील पोष्ट ऑफिस जवळील कार्यालयात १५ रुग्णांनी भेट दिली. अशा एकूण ३३ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला. क्लिनिकच्या भेट देणाऱ्या रुग्णांना समुपदेशन केले जाते. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना सांगण्यात येते. मुक्तीपथ तालुका कार्यालयांमध्ये ठराविक दिवशी क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणा-या जास्तीत जास्त रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.