गडचिरोलीत २२ जुलैपासून ‘वृक्ष लागवड पंधरवडा’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ४० लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या राज्य शासनाच्या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या उपक्रमाचा भव्य शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ जुलै रोजी गडचिरोली कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

यानिमित्ताने जिल्ह्यात २२ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान ‘वृक्ष लागवड पंधरवडा’ राबवण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ४० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आढावा बैठकीत वृक्षारोपणानंतर प्रत्येक झाडाची जपणूक व देखभाल करण्यावर भर देण्यात आला असून, एक झाड एक जबाबदारी या तत्त्वावर काम करण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले. केवळ लागवड करून थांबणे हा दृष्टिकोन बदलून संरक्षण आणि संगोपनावर भर देणे आवश्यक असून, हे अभियान केवळ शासकीय यंत्रणेपुरते मर्यादित न ठेवता नागरिक, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, युवक आणि पर्यावरणप्रेमींनी सहभागी होऊन लोकचळवळीत रूपांतर करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

बैठकीत नियोजनाच्या दृष्टिकोनातून विविध विभागांना समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजीत यादव, अप्पर पोलीस अधीक्षक आर. रमेश, उपवनसंरक्षक आर्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, जिल्हा माहिती अधिकारी संजय त्रीपाठी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणाला अनुसरून गडचिरोली जिल्हा हे एक हरित उदाहरण ठरेल असा विश्वास या मोहिमेमुळे व्यक्त होत आहे.