लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा, पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी मधमाशीपालनाचा व्यवसाय करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर – गडचिरोली येथे “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण” या ७ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविश्यांत पंडा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विभाग, गडचिरोली, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मधमाशी पालनातून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर कि. झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर करताना, या सात दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थींना मधमाशीपालनाचे सखोल ज्ञान व प्रात्यक्षिके देण्यात आल्याचे सांगितले.
प्रशिक्षणादरम्यान मध, मेण, राजान्न, पोलन इत्यादी उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संधींबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ञ व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सूचित के. लाकडे यांनी व्यक्त केले.