मांडूळ प्रजातीच्या दुर्मिळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. २५ एप्रिल: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे मांडूळ प्रजातीच्या दुर्मिळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना मंचर पोलिसांनी शिताफीने पकडून लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीचे साप हस्तगत केले आहे.      

याबाबत मंचर पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की, मौजे भराडी गावच्या हद्दीत बस स्टॉप समोर भराडी फाटा येथे येथे मांडूळ जातीच्या सापांची तस्करी होणार आहे. एक हिरो होंडा सीडी हंड्रेड एस.एस. मोटरसायकल नंबर MH14B-5304 यावर दोन इसम त्यांच्या ताब्यात  घेतले. १) संभाजी बाबुराव राजगुरू, रा. भराडी व २) सुनील दिलीप पवार, रा.निरगुडसर असे सांगितले. त्यांच्याकडचे सदर मांडूळ जातीचे साप कुठून आणले ते कोणास विक्री करणार होते? याबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली ते काही उपयुक्त व समाधानकारक उत्तरे देत नव्हते म्हणून त्यांना वाहनासह जागीच पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.

त्यानंतर सदर मांडूळ जातीचे साप मिळून आल्या बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पत्र पाठवून मांडूळ ताब्यात घेऊन फिर्याद देणेबाबत कळवले. त्यांनी सदर प्रकाराबाबत पोलीस स्टेशन मार्फत फिर्यादीवरून गुन्हा दाखल करावा असे कळविल्याने फिर्याद दाखल केली आहे.