८० कोटींच्या दोन पूल प्रकल्प व तातडीची रुग्णवाहिका सेवा लवकरच — माजी खा. अशोक नेते यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ठोस पाठपुरावा..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १४ जुलै — अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या धानोरा तालुक्याच्या विकासासाठी एक मोठा पाऊल उचलत भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री व माजी खा. अशोक नेते यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन दोन महत्त्वपूर्ण पूल प्रकल्प आणि तातडीच्या आरोग्य सेवेकरिता ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या सादर केलेल्या प्रस्तावामध्ये धानोरा–चिचोली दरम्यान कठाणी नदीवर ₹४० कोटींचा पूल, तसेच दूधमाडा–मिजगाव दरम्यान ₹४० कोटींचा पूल उभारणीचा समावेश आहे. याशिवाय गंभीर रुग्णांच्या वेळीच उपचारासाठी धानोरा शहरात ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

धानोऱ्यासारख्या परिसरात आजही पूलाच्या अभावामुळे नागरिकांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून ओढ्यांतून वाट काढावी लागते. अपघातग्रस्त, प्रसूतिवस्था किंवा आकस्मिक आजारात वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक निष्पाप जीव जातात. ही परिस्थिती केवळ विकासाचा नाही तर माणुसकीचा प्रश्न बनली आहे. त्यामुळे हे तीनही प्रस्ताव हा जीवनदायिनी उपाय असल्याचे मत नेते यांनी व्यक्त केले. यावेळी गडकरींनी या मागणीचे गांभीर्य ओळखून Central Road Fund (CRF) अंतर्गत तातडीने डीपीआर (Detailed Project Report) तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

या महत्त्वपूर्ण पाठपुराव्याच्या वेळी माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पडीशाल्लवार, आदिवासी आघाडीचे आयटी सेल प्रमुख अक्षय उईके, युवा नेते सारंग साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या निधीमुळे धानोऱ्यातील दळणवळण सुलभ होईल, आरोग्य सेवा गतिमान होईल आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे. नेते यांनी यावेळी सांगितले की, “विकास ही केवळ घोषणा नसून ती जनतेच्या जिवाशी जोडलेली जबाबदारी आहे. धानोरा आता विकासाच्या प्रवाहात मागे राहणार नाही यासाठी आम्ही सातत्याने झटत राहू.”