लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ७ जुलै : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मावस भावांचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे विहान ज्ञानेश्वर मडावी (वय १२, रा. शिरपूर) आणि रुदय ज्ञानेश्वर मडावी (वय ९, रा. गडचिरोली) अशी असून, दोघेही मावस भाऊ होते. विहान हा कुरखेडा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील कुरखेडा तालुक्यात शिक्षक आहेत. तर, रुदय हा गडचिरोलीत राहणारा असून त्याचे वडील जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. रुदय सध्या शाळेला सुट्टी असल्याने मावशीकडे पाहुणा म्हणून शिरपूरला आला होता.
आज सकाळी विहान आणि रुदय यांनी गावानजीकच्या नाजूक मडावी यांच्या शेतात सायकलने जात शेततळा पाहिला. पाण्याने भरलेल्या तळ्यात आंघोळ करण्याचा मोह त्यांना झाला. त्यांनी सायकल तळ्याच्या काठावर ठेवली. कपडे व चप्पल बाजूला काढून ते दोघेही पाण्यात उतरले. मात्र, तळ्याचे पाणी अपेक्षेपेक्षा खोल असल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि काही क्षणांतच जीवनाचा अंत झाला.
या घटनेची माहिती काही वेळानंतर तळ्याजवळून जाणाऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पाळीवर ठेवलेली सायकल, कपडे आणि चप्पल पाहून परिसरात शोधाशोध केली. याच वेळी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे दोघांचे मृतदेह त्यांना आढळून आले. ही दृश्ये पाहून गावकऱ्यांवर शोककळा पसरली. घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
दोन चिमुकल्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शिरपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षण घेत असलेले, निरागस आणि उत्साही दोन बालक एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्याच्या वळणावर हरवले, ही वेदना गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. पालकांच्या डोळ्यांसमोरचे हे चित्र असह्य ठरत आहे.
या हृदयद्रावक घटनेनंतर शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेततळी बांधताना सुरक्षेसाठी आवश्यक सूचना, कुंपण अथवा बोर्ड लावण्याची आवश्यकता प्रशासनानेही यानिमित्ताने गांभीर्याने लक्षात घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.