महागाव खुर्द येथिल दारूविक्रेत्यांना दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द येथे मुक्तिपथ-शक्तीपथ संघटना, गावकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते.  त्यावेळी गावातील अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेत दारूविक्रेत्यांना दोन दिवसांत अवैध दारूविक्री बंद करा, अन्यथा एक लाखाचा दंड भरण्यास तयार रहा. असा फर्मान यावेळी काढण्यात आला.
महागाव खुर्द येथे अवैध दारूविक्री होत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील दारूविक्री थांबविण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. त्यामुळे गावात आयोजित ग्रामसभेत दारूविक्रीबंदीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी मुक्तिपथ अहेरी तालुका प्रभारी नंदिनी आशा यांनी गावात दारूबंदी का असावी, दारूविक्रीचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर गावामध्ये दारूविक्रीबंदीचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार गावातील विक्रेत्यांकडून हमीपत्र लिहून घेत त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली. निर्णयाचे उल्लंघन करून गावात दारूविक्री करताना आढळून आल्यास थेट एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचे तसेच दारूबंदिला समर्थन करणाऱ्या व्यक्तीला किंवा महिलांना शिवीगाळ‌ करणाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचाही ठराव घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नक्कीच गावातील अवैध दारूविक्री बंद होणार, असे मत ग्रामस्थांतून व्यक्त केले जात आहे.
ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम नैताम, श्रीनिवास आलाम, उपसरपंच उमा मडगुलवार, पोलिस पाटील चंद्रकला कोडापे, शक्तिपथ संघटनेच्या पदाधिकारी ‌गंगुबाई तलाडे, सोनिया सिडाम, सपना तलाडे, माधुरी आलाम, सुनिता आलाम, समस्त ग्रामवासी, मुक्तीपथ तर्फे तालुका प्रभारी नंदिनी आशा  उपस्थित होते.
Comments (0)
Add Comment