महामार्गाच्या निष्काळजी कामामुळे दोघांचा मृत्यू; कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली – गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम निष्काळजी, बेजबाबदार आणि ठेकेदाराच्या मनमानीपणाचे प्रतीक ठरत असून, या कामाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे आतापर्यंत दोन निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. याप्रकरणी गडचिरोली पंचायत समितीच्या माजी सदस्य अमिता मडावी यांनी ठेकेदाराविरोधात थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

६ मे २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास भगचंद माणिक लिलारे (वय २८) या युवकाचा महामार्गाजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. काम सुरू असताना जेसीबीद्वारे सुरु असलेले खोदकाम, रस्त्यावर पसरलेली गिट्टी, कोणतीही सूचना अथवा मार्गदर्शक व्यवस्था नसल्यामुळे लिलारे यांची दुचाकी घसरून ते डोक्यावर आदळले आणि जागीच मृत्यू झाला. ठेकेदाराने ना रहदारी बंद केली, ना सुरक्षा नियमांचे पालन केले. यामुळे हा मृत्यू अपघात नसून प्रशासनाच्या डोळ्यादेखत झालेला व्यवस्थात्मक खून असल्याचा आरोप मडावी यांनी केला आहे.

या घटनेला महिनाभर उलटत नाही तोच १५ जून रोजी संजय ठाकूर (वय ४८) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने असंतोषात भर पडली आहे. महामार्गावरील खोदकामामुळे रस्ता चिखलात बदलल्याने त्यांचा ट्रक अडकला. वाहन नादुरुस्त झाल्यानंतर मानसिक तणावातून त्यांचा मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू महामार्गाच्या गैरव्यवस्थेमुळेच घडले असून, ठेकेदार पूर्णतः जबाबदार आहे, असा ठपका मडावी यांनी लावला आहे.

या आधीही गडचिरोली-धानोरा महामार्गावर चिखलात ट्रक अडकणे, ट्रक उलटणे अशा घटना घडल्या असून, वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत काहीच नियोजन नाही. ठेकेदाराने दोन्ही बाजूंनी रस्ता खोदल्यामुळे धानोरा शहरातून मार्गक्रमण करणे जीवघेणे ठरू लागले आहे.

अमिता मडावी यांनी यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही निवेदन दिले असून, ठेकेदाराच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महामार्गासाठी मुरुम टेस्टींग केलेला असणे आवश्यक असताना सध्या खोदकामातून निघालेली मातीच वापरण्यात येत आहे. दर्जाहीन आणि निकृष्ट कामाच्या तक्रारी असूनही संबंधित अभियंत्यांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. परिणामी कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यालाही निलंबित करावे, अशीही स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

एका बाजूला कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प, तर दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या जिवाशी खेळ. एकामागून एक मृत्यूच्या घटना आणि रस्त्यावरची अराजकता पाहता, हा महामार्ग अपघातांचा नाही, तर जबाबदारीशून्यतेच्या विळख्यात सापडलेला ‘मृत्यूमार्ग’ ठरत आहे. प्रशासन किती मृत्यूंची वाट पाहते हेच पाहणे बाकी आहे.

Dhanora city accidentDhanora roadGadchiroli dhanora roadRoad accident