गडचिरोलीत दुचाकींची समोरासमोर धडक : तरुण जागीच ठार, दोन अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २९ जून : शहरालगतच्या पोटेगाव-गुरवाळा मार्गावर रविवारी सकाळी ९.३० वाजता दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून, दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली आहे. आणखी दोन युवक किरकोळ जखमी झाले असून, संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत युवकाचे नाव राकेश प्रभाकर मुनघाटे (३०) रा. कुराडी असे असून, तो गडचिरोलीहून कामानिमित्त कुराडीच्या दिशेने जात होता. त्याच्यासोबत दुर्योधन विलास चौधरी आणि छत्रपती विनायक चौधरी हे दोघेही गडचिरोलीतील होते. समोरून भरधाव वेगात आलेल्या स्कुटीला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत राकेशचा जागीच मृत्यू झाला, तर सोबतचे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

दुसऱ्या स्कुटीवर असलेल्या अनुष्का आणि अक्षरा(दोघी वय १५, रा. गडचिरोली) या शालेय विद्यार्थिनी आहेत. त्या ट्युशननंतर शहरालगतच्या जंगल रस्त्यावर फोटोसेशनसाठी गेल्या होत्या. परतताना भरधाव स्कुटी थेट राकेशच्या दुचाकीवर आदळली. धडकेमुळे दोघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यापैकी अनुष्काची प्रकृती गंभीर असून, नागपूरला हलविण्याची तयारी सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत रुग्णवाहिका व पोलिसांना पाचारण केले. सर्व जखमींना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

या अपघातामागे वाहनांचा बेफाम वेग, रस्त्याची अरुंदता आणि अल्पवयीनांकडून वाहन चालवले जाणे हे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गडचिरोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, पोटेगाव मार्गावरील जंगल परिसर अलिकडे युवक-युवतींसाठी ‘फोटोशूट पॉईंट’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. ट्युशननंतर स्कुटीवरून जंगलात जाणे आणि सोशल मीडियासाठी फोटो टिपण्याच्या स्पर्धेत वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. यामुळे शहरातील सुशिक्षित पालकवर्गाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पालकांनो, किती अजून अपघात पाहायचे?

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यापूर्वी अनेक वेळा जाहीर आवाहन करून अल्पवयीन मुला-मुलींना दुचाकी, चारचाकी वाहन देऊ नका, असे बजावले होते. मात्र, दुर्दैवाने हे आवाहन केवळ कानावरून ऐकले गेले. आता मात्र पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकरणांमध्ये पालकांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल.

या अपघातानंतर गडचिरोलीतील पालक आणि प्रशासकीय यंत्रणांनी ‘स्मार्टफोन-प्रेरित धाडस आणि बेदरकार वाहनचालना’च्या प्रवृत्तीवर कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा रस्ते फक्त फोटोशूटसाठीचे नाहीत, तर मृत्यूचे स्टेज बनत जातील – याची जाणीव ठेवली पाहिजे. या घटनेनंतर आपल्याला नक्कीच शिकायला मिळणार आहे.

accidentgadchiroli policeGurwada road accidentMinner boys accident