अवैध रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; युवकाचा जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हिंगणघाट, दि.९ जानेवारी: अवैध रेतीवाहतुक करतांना नादुरुस्त अवस्थेत असलेल्या ट्रक्टरला दुचाकी धडकल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना नजीकच्या सातेफळ शिवारात घडली.

मृतक व्यक्ति चंद्रपुर जिल्ह्यातील नागरी रेल्वेस्टेशन येथे उप स्टेशनप्रबंधकपदी कार्यरत असून आपल्या स्वतःचे मोटरसायकलने अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार काल दि. ८ रोजी शुक्रवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास उपरोक्त घटना घडली असून मृतक नागरी येथिल रेल्वेस्टेशनवरती उपप्रबंधक पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. आकाश टिहु (२७)अशी त्यांची ओळख असून सदर व्यक्ति भिलाई, जिल्हा दुर्ग (छत्तीसगढ़) येथील रहिवासी आहेत. सद्या ते स्थानिक कोचर वार्ड येथे रहात असून अविवाहितच होते.

मृतक आकाश टिहु

त्यांची डयूटी आटोपुन मोटरसायकल क्र.सीजी-०७ एबी ४६३८ ने परत हिंगणघाटला येत असतांना सातेफळ शिवारात रेती भरलेल्या नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रक्टरवर त्यांची दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर प्रकरणी पोलिसांनी ट्रक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून चालक नरेश रामटेके यास ताब्यात घेतले आहे.

पुढिल तपास ठाणेदार संपत चौहाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगाशे हे करीत आहे.

Hinganghat AccidentHinganghat Police