तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला ठरल्या वाघाच्या बळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : तेंदूपत्ता संकलनाकरीता गेलेल्या दोन महिलांना वाघाने हल्ला करून ठार केले आहे. पहिली घटना वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गोगाव– महादवाडी गावालगत आज सोमवारी १० मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेत कल्पना दिलीप चुधरी (३५) असे ठार झालेल्या मृतक महिलेचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेत सिंधू दिवाकर मुनघाटे (६३)  रा. कुऱ्हाडी या ठार झाल्या आहेत. तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र आजच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडसा वनपरिक्षेत्रातील गोगाव नियतक्षेत्रात कल्पना दिलीप चूधरी (३५) आणि सिंधू दिवाकर मुनघाटे (६३) ह्या तेंदूपत्ता संकलना करीता गेल्या असता जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या नरडीचा घोट घेतला. दरम्यान आजू बाजूच्या लोकांनी आरडाओरड केली असता वाघ जंगलात पसार झाला.

सदर घटनेची  माहिती मिळताच  वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांना शेतात तसेच गावाला लागून असलेल्या जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरातील हि पाचवी घटना आहे, वारंवार अश्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे .

दोन दिवसाअगोदरच जिल्हयातील काही भागात तेंदुपत्ता हंगाम सुरू झाला. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले यामुळे राज्यभरात लॉकडाऊन लावण्यात आला त्यामुळे रोजगार सुध्दा हिरावला, तेंदुपत्ता हंगाम सुरू झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि तेंदुपत्ता संकलनामुळे पोटाचा प्रश्न सोडवण्यात मदत झाली. मात्र एकीकडे कोरोनाचे संकट उराशी असतांनाच मानव वन्यजिव संघर्ष मात्र थांबता थांबेना. तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याने मृतकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाची भिती तर मिळालेला हातचा रोजगार करण्यास गेले असता वाघाची भिती अशी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक चिंतेतही आहे.

हे देखील वाचा :

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये ८३ जागांसाठी भरती

 

lead storyTiger Attack