लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील दुर्गम कोडपे गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला शोकाकुल करून गेली. खंडी नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून जाऊन गावातील लालचंद कपिलसाही लकडा या केवळ १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील या तरुणाच्या निधनाने घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच मृतदेह घरी आणणे आणि अंत्यविधीसाठी आवश्यक असलेले खर्च भागवण्याची चिंता कुटुंबाला भेडसावू लागली. अशा कठीण वेळी काँग्रेस नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान संचालक अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत मदतीचा हात दिला आणि त्या कुटुंबासाठी जणू देवदूतच ठरले.
लालचंद सोमवारी कामानिमित्त खंडी गावात गेला होता. काम आटोपून परत येताना नाल्यावर अचानक पूर आल्याने त्याने वाहणारा नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो पाण्याबरोबर वाहून गेला. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अखेर बुधवारी त्याचा मृतदेह सापडला आणि नातेवाईकांनी त्याला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले.
या घटनेची माहिती मिळताच अजय कंकडालवार स्वतः रुग्णालयात पोहोचले आणि शोकाकुल परिवाराची भेट घेतली. कुटुंबाच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य स्वतः खरेदी करून दिले. मृतदेह स्वगावी नेण्यासाठी वाहनाचा प्रश्न गंभीरपणे उभा ठाकला असता, अजयभाऊंनी तातडीने खाजगी चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढील अंत्यविधी कार्यक्रमासाठीही आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
दुर्दैवी घटनेने परिवार कोसळलेला असतानाही कुटुंबाच्या दुःखाच्या क्षणी वडिलधाऱ्यासारखे आधार देणारे अजय आमच्यासाठी खरेच देवदूत ठरले असे मनोगत मृतकाच्या नातेवाईकांनी व्यक्त केले. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.