गोंडवाना विद्यापीठात ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’चा शुभारंभ माईनिंग, संगणक, मॅन्युफॅक्चरिंग व मेटलर्जी डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, जुलै ७ : गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नव्या शैक्षणिक संकुलात ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ (University Institute of Technology) या नावाने एक अभिनव आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. लॉईड्स मेटल्स कंपनीच्या सहकार्याने आणि भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून सदर संस्था कार्यान्वित होत असून, औद्योगिक क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

सदर संस्थेमार्फत ३ वर्षीय अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्यामध्ये पुढील चार शाखांचा समावेश करण्यात आला आहे –

1. मायनिंग इंजिनिअरिंग – कोड: 402670110U

2. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग – कोड: 402624210U

3. मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी – कोड: 402663010U

4. मेटलर्जिकल इंजिनिअरिंग – कोड: 402669210U

ही सर्व अभ्यासक्रमे तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या (DTE) मार्गदर्शनाखाली DTE पोर्टलवर नोंदणीकृत असून, १०वी उत्तीर्ण आणि पात्र विद्यार्थ्यांना ८ जुलै ते १० जुलै २०२५ दरम्यान DTE पोर्टलवर आपले प्रवेश पर्याय भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना पर्याय भरताना कोणतीही अडचण जाणवू नये यासाठी गोंडवाना विद्यापीठात ‘विद्यार्थी मदत केंद्र’ स्थापन करण्यात आले असून, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. मनीष उत्तरवार, प्रभारी संचालक, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था व संचालक, नवविकसन व सांघिक कार्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रा. उत्तरवार यांच्याशी ९८२२४६९६०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Diploma coursegondawana universityLloyd metalTechnology college