महाराष्ट्रातील अस एक गाव जिथं ६७ वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूक झाली नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर डेस्क 05 जानेवारी:- राज्यात सुमारे १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील एक गाव असे आहे, जिथे मागील ६७ वर्षापासून निवडणूकच झाली नाही. ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा गावाने अबाधित ठेवली आहे.

माढा तालुक्यातील निमगाव टे या गावात गेल्या 67 वर्षापासून ग्रामपंचायतीची एकदाही निवडणूक झाली नाही. विशेष म्हणजे गावातील सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया पार पडते. ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार गावातले जेष्ठ मंडळी ठरवतात. या प्रत्येक प्रभागातील एक उमेदवार सर्वानुमते ठरवला जातो. तोच उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतो. विरोधात कुठलाही उमेदवारी अर्ज नसल्याने निवडणूक बिनविरोध होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवसच विजयाच्या मिरवणुकीने समाप्त होतो.

गावचा परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे. निमगाव गावामध्ये तीन हजार लोकसंख्या असणारे गाव आहे. एकूण अकरा सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे गावांमध्ये विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. निमगाव या ग्रामपंचायतीला राज्य शासनाचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.